महाराष्ट्रात सांगली आणि नाशिक जिल्हा हे द्राक्षांचे आगार मानले जाते. याठिकाणी मोठ्या प्रमाणात द्राक्ष पिकांचे उत्पादन घेतले जाते.
यावर्षी उत्तम पाऊस आणि हवामान चांगले असल्याने द्राक्षांचे पीक जोमात आले आहे. असे असतानाच सांगली जिल्ह्यातील बस्तवडे या गावच्या शेतकऱ्यांना मात्र मोठा फटका बसला आहे.
इथल्या शेतकऱ्यांच्या द्राक्ष बागांवर अज्ञात रोगाची लागण झाल्याने संपूर्ण बागच वाळून गेल्या आहेत. हातातोंडाशी आलेले पीक डोळ्यादेखत जळत असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.
तासगाव तालुक्यातील बस्तवडे गावचे शेतकरी सचिन भोसले व विनायक हंकारे यांच्या द्राक्ष बागेतील झाडे अचानकपणे वाळू लागली आहेत.
जवळपास 2 हजार 300 झाडे वाळली आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे 30 ते 50 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
ही झाडे कशाने वाळली यावर संशोधन सुरू आहे. हातात तोंडाला आलेली बाग अचानक वाळल्यामुळे शेतकऱ्यांना धक्का बसला आहे.
27 वर्षात प्रभारतात द्राक्ष बागेमध्ये असा प्रकार निदर्शनास आला आहे. याचे नेमके कारण शोधण्यासाठी आम्ही नमुने घेतले आहेत.
त्या नमुन्यावरती प्रयोगशाळेत तपासणी करून निष्कर्ष काढले जातील.
यासाठी एक महिन्यांचा कालावधी लागेल त्यानंतर हा प्रकार कशामुळे घडला याचा खुलासा केला जाईल, असं पुणे येथील डॉ. रामटेके यांनी सांगितले आहे.