लग्नानंतर अनेक मुली बऱ्याचदा मुली चूल आणि मूल यामध्येच अडकून पडतात.
सांगली जिल्ह्यातल्या रमानंदनगर या छोट्याशा गावाची मेघा वाईंगडे-शिंदे या त्याला अपवाद ठरल्या आहेत.
त्यांनी नुकतीच कॅनडामधील ओंटारिया राज्यातील कृषी आणि ग्रामीण व्यवहार मंत्रालयात अन्न सुरक्षा निरीक्षकपदी पदभार स्वीकारलाय.
मेघा यांनी हा प्रवास कसा केला याची माहिती त्यांच्या आई-वडिलांनी दिलीय.
सांगली जिल्ह्यातील रामानंदनगर (ता.पलूस) येथील विजय वाईंगडे यांना दोन मुलं.
त्यामध्ये मेघा मोठी. त्यांना एक लहान भाऊ आहे. मेघा यांचे बारावीपर्यंतचं शिक्षण किर्लोस्कर विद्यालयात झालं.
त्यांनी कोल्हापूर येथील सायबर कॉलेजमध्ये फूड टेक्नॉलजीची पदवी घेतली.
मेघा यांचे लग्न कोल्हापूरच्या रोहन शिंदे यांच्याशी झाले. त्यावेळी रोहन मुंबईतील एका कंपनीत काम करत होते.
लग्नानंतर रोहन यांना कॅनडा देशात एका अॅनिमेशन कंपनीमध्ये नोकरी मिळाली.
रोहन यांनी मेघाला तिचे पुढचे शिक्षण पूर्ण करण्याचा सल्ला दिला आणि मेघाने दोन वर्षाचे एमएसस्सी शिवाजी विद्यापीठातून पूर्ण केले.
त्यानंतर जेव्हा कॅनडाला जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा मेघाचा व्हिसा तेथील सरकारने नाकारला. या दरम्यान मेघा कॅनडामधील भाषा शिकत, कॅनडा येथील नोकरीच्या शोधात होती.
तेथील स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करुन फूड इन्स्पेक्टरची परीक्षा दिली. त्या परीक्षेत त्यांना यश मिळाले.