आता घरीच तयार करा प्रदुषणमुक्त इंधन
कोळसा हे अनेक वर्षांपासून चालत आलेले पारंपारिक इंधन आहे.
लाकडापासून बनवला जाणारा कोळसा बनवणे म्हणजे प्रदूषण आणि पर्यावरणाला हानी असे समीकरण तयार झाले आहे.
या समीकरणाला छेद देत पुण्यातल्या संशोधिका डॉ. प्रियदर्शनी कर्वे यांनी एक नवं तंत्रज्ञान विकसित केलंय.
हे तंत्रज्ञान शास्त्रशुद्ध आणि निसर्गपूरक असून त्यामुळे प्रदुषणाशिवाय कोळशाची निर्मिती करता येणार आहे.
डॉ. प्रियदर्शनी कर्वे यांची पदार्थ विज्ञान या विषयामध्ये पीएचडी झाली आहे. वेगवेगळ्या पर्यावरणपूरक उपक्रमांद्वारे त्या जनजागृती करतात.
जैविक इंधन या विषयाचा अनेक वर्षे अभ्यास करून त्यांनी हे पर्यावरणपूरक कोळसानिर्मितीचे तंत्रज्ञान विकसित केलंय.
या तंत्रत्रानानं शेतातील, शहरातील बागांमधील काडीकचऱ्याचे कोळशामध्ये रूपांतर करता येते.
हे करत असताना हवामान बदल या विषयाकडं प्रामुख्यानं लक्ष दिलंय, असं डॉ. प्रियदर्शनी यांनी सांगितलं.
या तंत्रज्ञानासाठी त्यांनी सोप्या पद्धतीच्या भट्टीची रचना केलीय. यामध्ये जैविक कचरा प्रत्यक्षात तापवला जातो.
त्यामधून बाहेर पडणारा प्रदूषक गॅस पूर्णपणे जाळून टाकला जातो. त्यामुळे कोणत्याही प्रदूषणाविना निसर्गपूरक पद्धतीने कोळशाची निर्मिती होते, असे यामागचे विज्ञान आहे.
त्याचबरोबर कोळशावर चालणाऱ्या कुकरचीसुद्धा त्यांनी निर्मिती केली आहे.