पीएसआय बनतं सुनीलनं साकारलं आईचं स्वप्न!
लहानपणीच वडिलांचं छत्र हरपलं, त्यानंतर आईनं आपल्या दोन्ही मुलांना कष्टानं मोठं केलं.
मुलानेही जिद्द, चिकाटी आणि अभ्यासातील सातत्याच्या जोरावर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आपल्या आईचं स्वप्न साकारलं आहे.
नुकत्याच महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2020 अंतर्गत पोलीस उपनिरीक्षक पदाचा निकाल जाहीर झाला आहे.
यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील आगलावे गेवराई येथील सुनील गोर्डे या तरुणाने पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली आहे.
वडिलांचे छत्र हरपल्यानंतर त्याची आई अलकाबाई गोर्डे यांनी आपल्या माहेरी (आगलावे गेवराई ) येथे राहून आपल्या दोन्ही मुलांना मोलमजुरी करून शिक्षण दिले.
सुनीलचे पहीली ते सातवीपर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गेवराई बुद्रुक येथे झाले.
तर आठवी ते दहावी पिंपळगाव पांढरी येथील शारदा महाविद्यालय येथे तर अकरावी ते बारावी आडुळ येथील कन्या महाविद्यालायत तर आडुळ येथेच पदवीपर्यंत शिक्षण झाले.
सुनीलने 2017 पासून बीए शिक्षण झाल्यानंतर स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात केली. फ्रेबुवारी 2020 रोजी त्याने फॉर्म भरून अभ्यासाचे नियोजन करीत परीक्षा दिली.
नुकताच या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. त्यात तो पोलीस उपनिरीक्षक पदासाठी उत्तीर्ण झाला.