वडिलांचं स्वप्नं पूर्ण करत झाली RFO
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या वन विभागाच्या परीक्षांचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत.
या परीक्षेत यशस्वी झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याचा प्रवास हा प्रेरणादायी आहे.
त्यांनी आपल्या सभोवतालच्या परिस्थितीवर मात करत, जिद्दीनं अभ्यास करत, लक्ष्यावरील फोकस हटू न देता हे यश मिळवलंय.
कोल्हापुरातील एका महिलेनंही आपली आवड, सर्व जबाबादारी सांभाळत रेंज फॉरेस्ट ऑफिसर होण्याचं स्वप्न खरं केलंय.
कोल्हापुरातील जयसिंगपूर या ठिकाणच्या मोना विजय बेलवलकर असे या महिलेचे नाव आहे.
मोना यांनी या परीक्षेत मुलींमध्ये राज्यात तिसरी येण्याचा बहुमान मिळवलाय.
या यशामुळे त्यांच्या घरातील सर्व सदस्य, तसंच मित्र परिवारामध्ये आनंदाचं वातावरण आहे.
मोनानं अधिकारी व्हावं अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती.
आज ते हयात नसले तरी त्यांच्या मनातील इच्छा लेकीनं पूर्ण केली आहे.
त्यामुळे परिवारातील प्रत्येकाला आनंद झालाय, अशी भावना मोना यांच्या आई मृदुला यांनी व्यक्त केली.