मणिपूरच्या विद्यार्थ्यांना मराठीची गोडी!

भिन्न भौगोलिक परिस्थिती, परंपरा, चालीरिती आणि संवादासाठी मणिपूरीशिवाय कोणतीही भाषा अवगत नसलेले विद्यार्थी आता सोलापूरमध्ये चक्क मराठीचे धडे घेत आहेत.

जंगलात दिसेल तो पक्षी आणि प्राण्यांची शिकार करण्यात ही मुलं पारंगत आहेत. आता या मुलांना मराठीच्या शिक्षणाची गोडी लागलीय.

सोलापूरच्या ज्ञान प्रबोधिनी विद्यालयात हे मणिपूरचे विद्यार्थी मराठीचे धडे गिरवत आहेत.

मणिपूरी विद्यार्थी सोलापुरात कसे?
देशाच्या सीमावर्ती भागातील विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळावं हे ज्ञान प्रबोधिनीच्या संचालकांचं ध्येय होतं. हे ध्येय पूर्ण करण्यासाठी ही संस्था कार्यरत आहे. 

मणिपूर येथील तामिंगलांग, चुराचंदपूर,उखरूल या तीन जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थी साधारण 3 हजार किलोमीटर अंतरावरील सोलापूरमध्ये शिक्षणासाठी आले आहेत.

ज्ञान प्रबोधिनी ही मराठी शाळा आहे. या विद्यार्थ्यांना सोयीचं जावं म्हणून त्यांना शहरातील गांधीनाथा रंगाजी हायस्कूल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश मिळाला आहे. 

या विद्यार्थ्यांनी अवघ्या काही महिन्यांमध्येच मराठी भाषा आत्मसात करण्यास सुरूवात केली आहे. हे सर्व जण आता मराठी बोलू तसंच लिहू लागली असून संगीताचे धडेही मराठीत घेत आहेत.

अडीच ते तीन हजार किलोमीटर अंतरावरून सोलापुरात आलेल्या या विद्यार्थ्यांची मराठी भाषा शिकण्याची इच्छा प्रबळ आहे. 

त्यासाठी दररोज एक तास मराठी शिकविण्यासाठी वर्ग घेतला जात आहे. मुलांचा बाराखडी, जोडाक्षरे, वाचन याचा उत्तम सराव घेतला जात आहे.

या मुलांची ग्रहणशक्ती अफाट आहे. त्यामुळे त्यांनी कमी कालावधीमध्ये  छोटी छोटी वाक्यं बोलण्यास सुरूवात केली आहे, अशी माहिती या शाळेतील शिक्षिका गीतांजली पाटील यांनी दिली.