तुमच्या बाप्पाच्या सजावटीसाठी बाजारात काय आहे नवं? पाहा
चौदा विद्या, चौसष्ठ कलांचा अधिपती असलेल्या गणरायाच्या माघ महिन्यातील गणेश जयंती उत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत.
गणेश मूर्तीची नोंदणी आणि खरेदी, मखर, फुले, दिवे, कागदी आणि कापडी तोरण, पूजेचे तसंच प्रसादाचे साहित्य खरेदीसाठी मुंबईच्या दादरमधील बाजारपेठेत गणेशभक्तांची गर्दी दिसत आहे.
सर्वांचा लाडका बाप्पा 25 जानेवारी रोजी वाजत-गाजत घराघरात तसंच सार्वजनिक मंडळात विराजमान होणार आहे.
बाजारात काय आहे खास?गणरायाच्या सभोवताली आकर्षक सजावट करण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. दादरची बाजारपेठ त्यासाठी लागणाऱ्या सजावटीच्या साहित्यानं फुलली आहे.
कृत्रिम फुलांची आरास, कापडाचे गणेश मंदिर, घडी करता येणारे बाप्पाचे आकर्षक आसन अशी वेगवेगळे साहित्य सध्या उपलब्ध आहेत.
त्याची किंमत 400 रूपयांपासून पुढे आहे. त्याचबरोबर रंगीत झिरमिळ्या, गणरायाची नावे, मूषक असे विविध कटआऊट 50 रुपयांपासून पुढे उपलब्ध आहेत.