आईसाठी दिव्यांग प्रसन्न चालवतो चिकन 65 चा गाडा!
एक छोटीशी चिकन 65 ची गाडी.. वडिलांचे निधनानंतर दहावीच्या मुलाला गाड्यावर थांबावे लागणे..
त्यातही तो मुलगा एका हाताने अपंग.. जबाबदारीचं ओझे अंगावर पडल्यावर आयुष्य आपल्याला कसं जगायचं हे सांगून जातं.
कोल्हापूरच्या प्रसन्न तपकिरे या मुलाच्या उदाहरणावरुन हे सिद्ध होतंय.
कोल्हापुरातल्या फुलेवाडी परिसरात कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर एक छोटीशी चिकन 65 ची गाडी मनोज तपकिरे चालवत असत.
त्यांच्या गाड्यावर मिळणाऱ्या चिकनच्या चवीमुळे रोजच्या रोज इथे गर्दी व्हायची.
काळाने घात केला आणि अल्पशा आजाराने तीन वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले.
सर्व कुटुंबाची जबाबदारी ही त्यांची पत्नी अश्विनी यांच्यावर आली.
त्यांनी लॉकडाऊनमध्ये घरातूनच चिकन 65 बनवून पार्सल विकले.
कोरोना काळानंतर आता सर्व परिस्थिती पूर्वीप्रमाणे झाली असल्यामुळे त्यांनी त्यांचा चिकनचा गाडा पुन्हा सुरू करण्याचे ठरवले.
या प्रक्रियेत सर्वात मोठा निर्णय त्यांचा मुलगा प्रसन्नने घेतला.
चिकनच्या गाड्यावर खायला येणाऱ्यांपैकी काहीजण मद्यपान करूनच येतात.
त्यावेळी आईन त्या ठिकाणी थांबू नये यासाठीच प्रसन्नने स्वतः गाड्यावर थांबण्याचा निर्णय घेतला.
सध्या दहावीत शिक्षण घेणाऱ्या प्रसन्न हा लहानपणापासूनच एका हाताने अपंग आहे.
त्याचा डावा हात कोणतेही काम करू शकत नाही. त्यानंतरही गाड्यावरील सर्व कामे तो एका सर्वसामान्य मुलाप्रमाणेच करत असतो.