पेरणीच्या तोंडावर सर्जा-राजा विक्रीसाठी बाजारात

अल निनोच्या प्रभावामुळे यंदा पाऊस कमी होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 

मान्सून लांबल्याने शेतीची कामे आटोपून शेतकरी आभाळाकडे आस लावून बसलाय. 

पण मृग नक्षत्र संपत आल तरी देखील पाऊसाने हजेरी लावली नाहीये. त्यामुळे शेतकऱ्यांच्या काळजीत भर पडलीय. 

 वातावरणाचा अंदाज पाहून जालना जिल्ह्यातील अनेक शेतकरी आपल्या सर्जा-राजाला बाजाराचा रस्ता दाखवत आहेत. 

 मात्र, बाजारात गेल्यानंतर बैलांना योग्य दर मिळत नसल्याचं दिसून येत आहे.

जून महिना शेवटाकडे वाटचाल करत असून अद्यापही मराठवाड्यामध्ये पावसाने हजेरी लावली नाही. 

त्यामुळे सर्वत्र दुष्काळी परिस्थिती आणि पाणीटंचाईमुळे पशुधनाच्या विक्रीत वाढ झालीय. 

जिल्ह्यातील रामनगर या मोठ्या बैल बाजारात बैलांच्या किंमतीत घट झाल्याचे पाहायला मिळतंय. 

सध्या जनावरांना चारा आणि पाण्याची टंचाई भासत असल्यामुळे जनावरे विकण्यासाठी आलेल्यांची मोठी गर्दी दिसतेय. 

मात्र खरेदीदार फिरकत नाहीये. यामुळे जनावरांचे 20 ते 25 टक्के दरही घटले असून याचा दुहेरी फटका शेतकऱ्यांना बसत आहे.