वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दंगल गर्ल मैदानात!
स्वतः मल्ल असलेल्या महावीर फोगाट यांचे देशासाठी सुवर्ण पदक जिंकण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले होते.
तेच स्वप्न आपल्या मुलींकडून साकार करून घेणारी कहाणी आपण दंगल चित्रपटाच्या निमित्ताने पाहिली.
पण अशीच एक कहाणी जालन्यातदेखील साकार होतीय.
मोठा कुस्तीपटू होण्याचे स्वप्न अधुरेच राहिल्याने प्रकाश अंभोरे तेच स्वप्न आपल्या मुलींकडून पूर्ण करून घेण्यासाठी अहोरात्र मेहनत करून घेत आहेत.
यासाठी त्यांनी आपल्या शेतात आखाडा तयार केला आहे.
जालना शहरापासून 50 किमी अंतरावर असलेले पिंप्री हे प्रकाश अंभोरे यांचे गाव आहे.
प्राची आणि ईश्वरी या दोन मुली त्यांना आहेत. प्रकाश अंभोरे लहानपणापासून गावात कुस्त्या करायचे.
मात्र सुविधांचा अभाव यामुळे मोठा कुस्तीपटू होऊ शकले नाहीत. ही सल त्यांच्या मनात कायम बोचत होती.
लग्न झाल्यावर मुलगा झाल्यास त्याला आपण मल्ल बनवू असा त्यांचा विचार होता. परंतु, पहिली दोन्ही आपत्ये त्यांना मुली झाल्या.
तरीही हार न मानत त्यांनी आपल्या दोन्ही मुलींना कुस्तीचे धडे गिरवायला सुरुवात केली.
शेतातच स्वखर्चाने त्यांनी आखाडा तयार केला असून साहित्य उपलब्ध करून दिले आहे.
त्यांच्या दोन मुली आणि गावातील 20 ते 25 मुला मुलींना ते दररोज कुस्तीचे धडे देत आहेत.