ड्रॅगन फ्रूट शेतीमधून शेतकरी मालामाल!

लहरी निसर्ग, बाजार भावातील चढ उतार आणि सरकारी धोरणे याचा फटका शेतकरी वर्गाला नेहमीच बसत असतो. 

 मात्र असे असतानाही काही शेतकरी न डगमगता आपल्या शेतात नावीन्यपूर्ण प्रयोग करत राहतात. 

असाच एक प्रयोग जालना जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने केलाय. 

एक एकर ड्रॅगन फ्रूट शेतीमधून या शेतकऱ्याने तब्बल पाच लाखांचे उत्पन्न मिळवले आहे. 

जालना जिल्ह्यातल्या साळेगाव येथील शेतकरी विठ्ठल डिखुळे यांच्याकडे पाच एकर वडिलोपार्जित शेती आहे. 

एके दिवशी ते सोलापूर जिल्ह्यात काही कामानिमित्त गेले असता त्यांना माळरानावर लावली ड्रॅगन फ्रूटची बाग दिसली. 

घरी आल्यानंतर त्यांनी या फळविषयी आणखी चौकशी करण्यास सुरुवात केल्यानंतर गावातीलच एका शेतकऱ्याने याची लागवड केली असल्याची माहिती त्यांना मिळाली. 

त्यानंतर त्यांनी व्यवस्थित माहिती घेऊन आपल्या शेतावर ड्रॅगन फ्रूट लागवडीचा निर्णय घेतला.

डिखुळे यांनी 2019 साली गावातील शेतकऱ्यांकडूनच रोपं खरेदी करत एक एकरामध्ये 7 बाय 12 अंतरावर रोपांची लागवड केली. 

अठरा महिन्यांनी पहिल्यांदा मला याचे 3 ते 4 क्विंटल उत्पादन मिळाले. 

यंदा तिसऱ्या वर्षी मला 40 ते 45 क्विंटल उत्पादन झालंय. साडेचार ते पाच लाख उत्पन्न मिळालंय, असं विठ्ठल डिखुळे यांनी सांगितले.