पारशी टेकडीवर गेल्यावर्षी पुर्नलागवड केलेला वटवृक्ष चांगलाच बहरलाय.
शहरातील अनेक नागरिक या वटवृक्षाला भेट देऊन त्यापासून जगण्याची प्रेरणा मिळवत आहेत.
या वटवृक्षाबरोबरच आणखी 12 वटवृक्षांची या टेकडीवर पुर्नलागवड करण्यात येणार आहे.
जालना- छत्रपती संभाजीनगर महामार्गावर असलेल्या बदनापूर येथे गेल्यावर्षी जुलै महिन्यात एका व्यक्ती घराच्या भिंतीला वटवृक्षाचा अडथळा निर्माण होत होता.
त्यामुळे त्याने वटवृक्षाची रितसर परवानगी घेऊन वृक्षतोड सुरू केली होती.
वटवृक्षाची होत असलेली तोड जालना शहरातील उद्योजक आणि पर्यावरणप्रेमी सुनील रायठठ्ठा यांना पाहवली नाही.
त्यांनी स्वयंसेवी संस्थेच्या मार्फत जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांना संपर्क साधला.
त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करत ही वृक्षतोड थांबवण्याचे आदेश दिले.
रायठठ्ठा यांनी दरम्यानच्या काळात तोडण्यात आलेल्या वटवृक्षाचे महाकाय खोड हे पारसी टेकडीवर नेऊन तेथे त्याची पुनर्लागवड करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांपुढे ठेवला होता.
हा प्रस्ताव मान्य झाल्यानंतर त्याची पारशी टेकडीवर पुर्नलागवड करण्यात आली.
पारशी टेकडीवर या वटवृक्षाला जवळपास सात महिने रोज 1 हजार लिटर टँकरनं पाणी देण्यात आलं. त्याचबरोबर त्याला खतही देण्यात आले.
आठ महिन्यांच्या परिश्रमानंतर हा वटवृक्ष पुन्हा बहरला असून त्याला पालवी फुटली आहे.