कायद्याने गुन्हा असला तरी आजही होतात 'बालविवाह'. बिहारमधून समोर आला संतापजनक प्रकार.
मधुबनात एका अल्पवयीन मुलीचं जबरदस्तीने लावण्यात आलं एका वयस्कर व्यक्तीशी लग्न.
तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत 13 वर्षांची निरागस मुलगी 50 वर्षांच्या पुरुषाशी लग्न करायला बोहोल्यावर चढली.
मुलगी ओक्साबोक्शी रडत होती, लग्न लावून देऊ नका म्हणून जोरजोरात किंचाळत होती. मात्र तिचा आवाज समाजाने दाबून टाकला.
'मला हे लग्न नाही करायचंय. लग्न झालं तर मी मरून जाईन', असं ती जिवाच्या आकांताने ओरडून ओरडून सांगत होती...पण तिचं कोणीच काही ऐकून घेतलं नाही.
नातेवाईकांनी हात पकडले, मान आवळली, तिचा दम घोटून भांगात कुंकू भरण्याचा विधी पार पडला.
गुरूजीनेही हद्द गाठली; तिच्यावर डोळे वटारले, मंत्रांतून तिला फटकारले.
लग्न विधिवत पार पडलं, सनई-चौघडे वाजले, नातेवाईक नाचू लागले, मात्र 'ती'ला पूर्णतः अंधार दिसत होता. रडून रडून पाणी सुकलेल्या तिच्या डोळ्यांपुढे फक्त अंधार पसरला होता.
या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, याविरोधात देशभरातून संताप व्यक्त होत आहे.