जेवणासोबत घ्या पुस्तकांची मेजवानी; 75 वर्षांच्या आजींचे लय भारी हॉटेल
नाशिकच्या ओझर जवळील दहाव्या मैलावर 75 वर्षांच्या भीमाबाई जोंधळे या आजीबाईनी सुरू केलेले 'हॉटेल रिलॅक्स कॉर्नर' सध्या चांगलेच चर्चेत आले आहे.
वाचन संस्कृतीला प्रेरणा मिळावी यासाठी भीमाबाई जोंधळे आजीबाईनी आपल्या हॉटेलमध्ये चमचमीत जेवणासोबत अस्सल दर्जेदार पुस्तकांची देखील मेजवानी उपलब्ध करून दिली आहे.
हॉटेल रिलॅक्स कॉर्नर मध्ये बसल्यानंतर जणू ग्रंथालयात बसल्याचा भास होतो. अतिशय उत्तम पद्धतीने त्यांनी या अनोख्या उपक्रमाची मांडणी केली आहे.
तुम्हाला हवं ते पुस्तक इथं वाचायला मिळतं. तुम्ही बसलेल्या टेबलवरती चार ते पाच पुस्तकं वेगवेगळी ठेवलेली असतात.
ती जर तुम्हाला आवडली नाहीत तर शेजारी असलेल्या अलमारीतून तुम्ही हवं ते पुस्तक घेऊ शकतात.
या पुस्तकांचा समावेश
बाळाची नाती, फिंद्री, मी आपला उगीचच, माती, सावित्री, सुविचार, सांज किरणे, जागृती, दिंडी निघणार आहे, विचार धन, लोकरंग नाट्यरंग
ज्ञानज्योती, अस्वस्थ कल्लोळ, अवर्त, भारतीय शासन राजकारण, एका गावाची गुलाबी गोष्ट, दारणाकाठच्या पाऊलखुणा, मातीची मुळाक्षरे, चंद्रकोर यांसारखे अनेक पुस्तकं या ठिकाणी उपलब्ध आहेत.
मला अगोदर पासूनच वाचनाची आवड होती. त्यामुळे वाचन संस्कृतीला प्रेरणा मिळेल या हेतूने आम्ही या हॉटेल मध्येच पुस्तकं ठेवण्याचा विचार केला.
आणि अखेर उपक्रम राबवला मात्र बघता बघता तो लोकांच्या पसंतीस उतरला, असं भीमाबाई जोंधळे यांनी सांगितलं.