वास्तूशांतीनंतरही घरात कटकटी होत आहेत?

आपल्या घरात शांतता नांदावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. आपण रात्रंदिवस त्यासाठी प्रयत्न करतो.

बऱ्याचदा सर्व सोयीसुविधा असूनही घरात शांतता नसते. लहान मोठ्यांचा आदर करत नाहीत तर मोठ्यांना लहानांच्या गोष्टी समजत नाहीत.

प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टीवर भांडणे होतात. कधीकधी मानसिक समस्या देखील उद्भवतात.

या अडचणीत कसा मार्ग काढावा यावर पुण्यातील वास्तूतज्ज्ञ कुलदीप जोशी यांनी टिप्स दिल्या आहेत.

वास्तू शास्त्रानुसार, ईशान्य दिशा म्हणजे सकारात्मक आणि प्रगतीशील ऊर्जा निर्माण होते. घरातील मंदिरासाठी हे आदर्श स्थान आहे. 

ईशान्य दिशा भगवान कुबेर नियंत्रित करते. ते भगवान शिवाचं स्थान आहे. घरामध्ये कुठेही ईशान्य कोपऱ्यात अडथळा नसावा.

घरामध्ये जर सतत वाद विवाद होत असतील तर घराच्या ईशान्य कोपऱ्यात चप्पल स्टॅन्ड किव्हा कचऱ्याचा डब्बा ठेवू नये, ईशान्य कोपऱ्यात शौचालयासंबंधी वस्तू ठेवू नये. 

त्यामुळे नकारात्मक शक्तींचा प्रवाह वाढतो आणि संपत्तीचा ऱ्हास होतो, असे जोशी यांनी सांगितले.

स्वयंपाकघर ईशान्य दिशेला असेल, तर ते वास्तूसाठी अनुकूल नाही, असंही जोशी यांनी सांगितलं.

ईशान्य कोपऱ्याकडे जाणारा उतार शूभ आहे. वास्तुशास्त्रानुसार, पूर्व आणि उत्तरेकडे झुकलेली ठिकाणे शुभ आहेत आणि सर्वत्र समृद्धी आणि आरोग्य आणतात.

 ही दिशा पाण्याशी संबंधित असल्याने, पाण्याचा उतार ईशान्येकडे असेल तर ते संपत्ती वाढीसाठी फायदेशीर आहे, असंही जोशी यांनी स्पष्ट केलं.

(सूचना : येथे दिलेली माहिती तज्ज्ञांचं वैयक्तिक मत आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)