विद्यार्थ्यांनी टायर पासून तयार केला वाचन कट्टा!

नाशिक जिल्ह्यातल्या मालेगावच्या जिल्हा परिषद शाळेनं एक खास उपक्रम राबविलाय. या शाळेतील विद्यार्थ्यांनी टाकाऊ टायरपासून टिकाऊ वाचन कट्टा सुरू केला आहे.  

या हटके उपक्रमामुळे ही शाळा सध्या चांगलीच चर्चेत आहे. त्याचबरोबर वाचन कट्ट्यामुळे शाळेच्या अंगणाची शोभा देखील वाढली आहे.

कसा तयार झाला कट्टा?
हल्ली प्रत्येक घरामध्ये वाहन असतं. चारचाकी नसली तरी दुचाकी गाडी बहुतेक घरामध्ये असते. 

या गाडीचं टायर खराब झाल्यानंतर आपण ते फेकून देतो. त्याचा दुसरिकडं कुठंही वापर करत नाही.

जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक भरत पाटील यांच्या ती बाब लक्षात आली. त्यांनी शाळेच्या अंगणात वाचन कट्टा करण्याचं ठरवलं. त्यांनी विद्यार्थ्यांना ही कल्पना समाजवून सांगितली.

त्यानंतर विद्यार्थ्यांनी घरी पडलेले टायर आणले आणि त्याला छान रंगरंगोटी केली. हे सर्व टायर शाळेच्या अंगणात मांडले आणि सुंदर असा वाचन कट्टा बनला.

 हा कट्टा पाहणारा प्रत्येक जण विद्यार्थ्यांच्या कौशल्याचं कौतुक करत आहे, असं शिक्षक भरत पाटील यांनी सांगितलं.

 वेगवेगळ्या रंगांच्या टायरवर बसून अभ्यास करायला आम्हाला मजा येत आहे, असं कट्टा तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सांगितले.