रंगकाम करणाऱ्या मजुराची मुलगी झाली उद्योग निरीक्षक!
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससीच्या परीक्षांचे निकाल काही दिवसांपूर्वीच लागले.
या परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांनी प्रतिकुल परिस्थितीवर मात करत यश मिळवलं आहे. मुंबईची रुपाली तुकाराम कापसे ही अशीच एक यशस्वी उमेदवार आहे.
गरीब कुटुंबातील रूपाली आता उद्योग निरिक्षक म्हणून काम करणार आहे. रुपालीनं या यशस्वी प्रवासाचं रहस्य सांगितलं आहे.
मी बारावीला असतानाच स्पर्धा परीक्षा देण्याचं नियोजन केलं होतं. पदवीच्या शेवटच्या वर्षी अभ्यासाला सुरूवात केली. सुरुवातीला मला कुणाचंही मार्गदर्शन नव्हतं.
त्यातच दोन वर्ष कोरोना होता. त्यामुळे या काळात स्पर्धा परीक्षा झाल्या नाहीत. हा माझ्यासाठी संघर्षाचा काळ होता.
आर्थिक अडचणी प्रत्येकालाच असतात. मात्र, त्या अडचणींना आपण कवटाळून ठेवायचं की त्या अडचणींवर मात करून पुढे जायचं हे आपल्या हातात असतं.
मला सुद्धा काही आर्थिक अडचणी होत्या. मात्र मी त्यांचा फार काही बाऊ केला नाही. माझी आई घरकाम करते तर वडील मजुरी करतात ते रंगकाम करतात.
मी या अडचणींवर मात करून पुढे जायचं ठरवलं.
मी चुनाभट्टी सारख्या परिसरामध्ये राहते. एका छोट्या चाळीत आमचं घर आहे.एका छोट्याशा घरात आमचं कुटुंब राहतं.
मी ज्या ग्रंथालयामध्ये अभ्यास केला ते ग्रंथालय देखील फक्त दहा बाय दहाच आहे.
त्यामुळे अडचणी बऱ्याच आल्या पण माझे ध्येय फिक्स होतं.
अभ्यास केला, वाचन केलं आणि मी आज एक अधिकारी म्हणून तुमच्यासमोर आहे,' असं रुपाली यावेळी म्हणाली.