मकर संक्रातीनिमित्त घ्या हलव्याचे दागिने
नवीन वर्ष सुरू होताच आता सर्वांना मकर संक्रांतीचे वेध लागले आहेत. मकर संक्रातीनिमित्त हलव्याचे दागिने घालणे ही आपली परंपरा आहे.
या निमित्तानं नव दाम्पत्याचे, सुनेचे, लेकीचे आणि तान्ह्या बाळापासून ते पाच वर्षांपर्यंतच्या मुलाचे कौतुक व्हावे हा त्यामधील हेतू असतात.
मुंबईतील बाजारात संक्रातीच्या निमित्तानं हलव्याचे कोणते दागिने यावर्षी ट्रेन्डिंग आहेत ते पाहूया.
काय आहे नवं?
ग्राहकांची आवड लक्षात घेता दागिन्यातही नवे प्रकार दिसू लागले आहेत.
कुंदन, टिकल्या, वेगवेगळ्या प्रकारचे मणी, हलवा यांपासून बनवलेले मंगळसूत्र, ठुशी, हार, नथ, कानातले, वेल, बांगड्या, तोडे, बाजूबंध तसेच नाजूक नक्षीकाम केलेले हलव्याचे दागिने ऑर्डर प्रमाणे बनवून मिळतात.
महिलांप्रमाणे पुरुषांसाठीही वेगवेगळे दागिने आहेत. पुरुषांसाठी हलव्याच्या माळांनी सजवलेला फेटा, पगडी, हार, अंगठी, बिगबाळी, पेन,पारंपरिक हलव्याच्या दाण्यांनी सजवलेले श्रीफळ बाजारात आहेत.
तान्ह्या बाळाचे बोरन्हाण करण्यासाठी `वाळा सेट' बनवला जातो, ज्यात श्रीकृष्णाच्या पेहराव्यासकट, गळ्यातला हार, गजरे, मुकुट, बासरी, मोरपीस असते.
तर, छोट्या मुलींसाठी माळ, हेअरपीन, कानातले, बांगड्या ह्यांचा सेट मिळतो. पाच वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी तऱ्हेतऱ्हेचे दागिने मिळतात.
दागिन्यांची किंमत 500 रुपयांपासून आहे. यंदा जावई हार चांगलाच चर्चेत आहे.