कोल्हापूरमध्ये Green Hydrogen जनरेटरचं यशस्वी संशोधन
कोल्हापूरच्या एका संस्थेच्यावतीने नुकतेच एका ग्रीन हायड्रोजन जनरेटर युनिटचे यशस्वी संशोधन करण्यात आले आहे.
तळसंदे येथील डी. वाय. पाटील टेक्निकल संस्थेच्या संशोधन केंद्रातील प्राध्यापक आरिफ शेख यांनी हे संशोधन केले आहे.
केंद्र सरकारच्या हरित ऊर्जा धोरणाच्या अर्थात मिशन ग्रीन हायड्रोजनच्या दृष्टीने हे संशोधन महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यात असणाऱ्या तळसंदे येथील डी. वाय. पाटील टेक्निकल संस्थेत नव्याने एक संशोधन केंद्र उभारण्यात आले आहे.
आरिफ शेख हे या ठिकाणी संशोधक आणि प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.
रिसर्च अँड इनोव्हेशन म्हणून केंद्र शासनाच्या मिशन ग्रीन हायड्रोजन अंतर्गत 100 टक्के ग्रीन हायड्रोजन जनरेटर युनिटचे संशोधन आणि निर्मीती केली आहे.
हे युनिट पूर्णपणे स्वयंचलित आहे. दुचाकी आणि चारचाकी यांच्या टू-स्ट्रोक आणि फोर-स्ट्रोक इंजिन साठी हे मॉडेल बनवण्यात आले आहे. हे युनिट संपूर्णत: सौरऊर्जेवर कार्य करणार आहे.
या मध्ये पाण्याच्या इलेक्ट्रोलिसीस पासून हायड्रोजन वायू पाण्यापासून वेगळा करण्याची पद्धती वापरात आणून अचूक संशोधनानंतर दोन वेगवेगळ्या हायड्रोजन सेल्सची निर्मिती केली आहे, असे आरिफ शेख यांनी सांगितले.
कसे काम करते हे युनिट ?
या युनिटमध्ये पाण्याच्या इलेक्ट्रोलिसीसपासून हायड्रोजन वायूची निर्मीती केली जाते.
यामध्ये अचूक संशोधनकरुन दोन वेगवेगळ्या हायड्रोजन सेलची निर्मिती करण्यात आली आहे. या तंत्रज्ञानामुळे ऊर्जा निर्मिती होत असताना अवशेष म्हणून निव्वळ पाणी शिल्लक राहील.
या प्रक्रियेदरम्यान धूर निघण्याची अजिबात शक्यता नाही, असे शेख यांनी स्पष्ट केले.
या युनिटचे वैशिष्ट्य म्हणजे हायड्रोजन वायू निर्माण करण्यासाठी औष्णिक ऊर्जा, सौर व पवन ऊर्जेचा वापर केला जाऊ शकतो.
कमीत कमी खर्चामध्ये वीजनिर्मिती तसेच त्याचा वापर मोटार अवजड गाड्यांमध्ये होणार असल्याचे शेख यांनी सांगितले.