विडी कामगार महिलेनं सुरू केलं 'हाऊस ऑफ पराठा'
सोलापुरातील 'हाऊस ऑफ पराठा' मध्ये 40 ते 50 प्रकारचे पराठे मिळतात.
एकेकाळी विडी कामगार असलेल्या अनुराधा सोमा यांनी हे पराठा हाऊस सुरू केलंय. गेल्या 10 वर्षांपासून अनुराधा हा व्यवसाय करत आहेत.
कशी झाली सुरूवात?
अनुराधा या कॉलेजमधील विद्यार्थ्यांना मेसचे डबे पुरवत असत. या विद्यार्थ्यांना चांगल्या चवीसोबतच पोष्टिक आहार मिळावा यासाठी त्या डब्यात रोज वेगळे पदार्थ देण्याचा प्रयत्न करत.
यामधूनच त्यांनी वेगवेगळ्या भाज्या मिक्स करून पराठे बनवले. खायला रुचकर आणि चवीला खमंग असणारे हे पराठे लवकरच हिट झाले.
कसे बनवतात पराठे?
सुरुवातीला पीठ व्यवस्थित मळून घ्यावे. त्याला तेल लावून त्याचे उंडे बनवून घ्यावे.
बटाट्याचा पराठा करताना सुरूवातीला बटाटा उकडून घ्यावा, त्यानंतर त्यामध्ये मिरची, लसूण अद्रकची पेस्ट, हळद ,गरम मसाला आणि चवीनुसार मीठ टाकून ते एकजीव करून घ्यावे.
मळलेल्या पिठाच्या उंड्याचा खोलगट भाग करून त्यामध्ये ते स्टफिंग भरून घ्यावेत.त्यानंतर तव्यामध्ये बटर टाकून ते भाजून घ्यावेत.
सोलापुरकरांना आवडेल अशा पद्धतीनं पौष्टिक पदार्थ बनवण्याकडे माझा कल असतो. पारंपारिक पदार्थांना नव्या पद्धतीचा वापर करीत उत्तम क्वालिटी राखत हे पराठे मी बनवले आहेत.
आमच्या प्रामाणिकतेमुळेच आज आमच्या या 'हाऊस ऑफ पराठा' या हॉटेलला अनेक जण फ्रॅंचायजी देण्याची मागणी करीत आहेत, अशी माहिती अनुराधा यांनी दिली.