पुरणपोळी हा संपूर्ण महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीमधील महत्त्वाचा पदार्थ आहे. राज्याच्या प्रत्येक भागात ही बनवण्याची खास पद्धत आहे.
खान्देशात मोठ्या आकाराची पुरणपोळी बनवली जाते. त्याला मांडे असं म्हणतात. हे मांडे कसे बनवतात हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
मांडे बनवण्यासाठी गव्हाचे पीठ बारीक दळून आणावे आणि कापडाने चाळून घ्यावे. त्याशिवाय बारीक रवा देखील या पुरणपोळीसाठी चालतो.
ही पोळी करण्यासाठी सुरूवातीला सैलसर पीठ मळून घ्यावे आणि ते वीस मिनिटं झाकावं. त्याचबरोबर हरभऱ्याची डाळ शिजवून त्यामधील उरलेलं पाणी काढावं.
डाळीमध्ये गूळ टाकून ती पुन्हा शिजवावी आणि पुरण यंत्रातून वाटावी. त्यामध्ये जायफळ, वेलची पूड घालून पुरण थंड करुन घ्यावे.
पूरण भरून पोळी थापावी त्यानंतर हलक्या हाताने लाटणे फिरून मोठी करावी.
या पोळीला मोठं करण्यासाठी हात आणि कोपऱ्याचा वापर करावा. ही पद्धत अवघड असली तरी सरावानं जमू शकते.
ही पुरणपोळी तव्यावरनं न भाजता खापर, मडक, अथवा कढईच्या उलट्या भागावर भाजायला टाकावी.
खान्देशी पुरणपोळी तव्यावर न भाजता चुलीवरील खापरावर भाजली जाते, ही याची मुख्य खासियत आहे.
एक बाजू भाजून झाल्यानंतर दुसरी बाजू भाजून ही पोळी अलगदपणे काढावी. त्यानंतर साजूक तूप घालून पुरणपोळी खावी.