चंद्रमुखी उमाजीराव जुन्नरकर...! Expression Queen अमृता खानविलकर जगतेय 'चंद्रा'

अभिनेत्री आणि उत्तम नृत्यांगना म्हणून ओळखली जाणारी अमृता खानविलकर आगामी सिनेमात लावणीसम्राज्ञीच्या रूपात समोर येणार आहे.

'चंद्रमुखी' असं या सिनेमाचं नाव असून, त्यात अमृताने लावणीसम्राज्ञी चंद्रमुखी उमाजीराव जुन्नरकर म्हणजेच चंद्राची भूमिका साकारली आहे.

29 एप्रिल 2022 रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार असून, त्यातलं 'चंद्रा' हे पहिलं गाणं 29 मार्चला रिलीज झालं.

ही लावणी रिलीज होताच रसिकांनी डोक्यावर घेतली असून, या लावणीची बरीच चर्चा होत आहे.

अमृताचं अप्रतिम नृत्यकौशल्य, दिलखेचक अदा, खट्याळ एक्स्प्रेशन्स, नेत्रपल्लवी अशी लावणीची सगळी वैशिष्ट्यं या गीतात पाहायला मिळत आहेत.

'लावणीला न्याय फक्त अमृताच देऊ शकते,' 'तिच्या डान्सला तोड नाही,' 'खूपच सुंदर आहे,' अशा प्रतिक्रिया रसिकांनी व्यक्त केल्या आहेत.

2010 साली अमृताचं 'नटरंग'मधलं 'वाजले की बारा' हे लावणीनृत्य खूप लोकप्रिय झालं होतं. त्यानंतर आता ती चंद्राच्या रूपाने पुन्हा लावणी सादर करत आहे.

चंद्रमुखी हा सिनेमा म्हणजे खासदार दौलत देशमाने आणि लावणी कलावंत चंद्रा यांची प्रेमकहाणी आहे. देशमानेंच्या भूमिकेत आदिनाथ कोठारे आहे.

हा सिनेमा विश्वास पाटील यांच्या 'चंद्रमुखी' या कादंबरीवर आधारित असून, सिनेमाची पटकथा आणि संवाद चिन्मय मांडलेकरने लिहिले आहेत.

प्रसाद ओक दिग्दर्शित, प्लॅनेट मराठी निर्मित या सिनेमातल्या गुरू ठाकूर यांच्या गीतांना अजय-अतुल यांनी संगीत दिलं असून, श्रेया घोषालने ती गायली आहेत.

रॉयल ऑपेरा हाउसमध्ये 35 फुटांच्या कटआउटद्वारे चंद्राचा लुक सादर झाला. मराठी सिनेमातल्या अभिनेत्रीचा लुक असा सादर करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

तुम्ही पाहिलंत ते तुम्हाला आवडलं?