नवी दिल्ली, 3 नोव्हेंबर : आपल्याकडे काही वर्षांपूर्वी 'विकी डोनर' नावाचा एक हिंदी चित्रपट आला होता. त्यातून पहिल्यांदाच स्पर्म डोनेशनचा (Sperm Donation) विषय उघडपणे हाताळण्यात आला. आयुष्मान खुराणा, यामी गौतम आणि अनू कपूरच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटामध्ये शेवटी एक गमतीशीर सीन आहे. अभिनेता आयुष्यमान खुराणा 15-20 लहान मुलांना खेळताना पाहत आहे. ही सर्व मुलं त्याचीच असल्याचं त्याच्या लक्षात येतं असं या चित्रपटात दाखवलं होतं. कारण, या मुलांच्या पालकांना त्यानेच स्पर्म डोनेट केले होते. हा सीन पाहून तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का, चित्रपटातील हा सीन प्रत्यक्षात घडला तर..? इटलीमध्ये अशी घटना प्रत्यक्षात घडली आहे. स्पर्म डोनेशनमधून जन्मलेल्या एका मुलीने आतापर्यंत आपल्यासारखा डीएनए (DNA) असलेल्या एकूण 50 जणांचा शोध घेतला आहे.
ब्रिटिश टॅबलॉईड 'द सन'नं दिलेल्या वृत्तानुसार, काही दिवसांपूर्वी @izzyvn_98 नावाच्या एका टिक टॉक (TikTok) युजरने व्हिडीओ शेअर करून एक आश्चर्यकारक खुलासा केला होता. स्वत:ला इटालियन (Italian) समजत असलेल्या या युजरने 2018 मध्ये आपल्या पूर्वजांची माहिती मिळवण्यासाठी डीएनए चाचणी केली होती. डीएनए चाचणीनंतर ती इटालियन नसल्याचं समोर आलं, असं या व्हिडीओमध्ये तिनं सांगितलं. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर या युजरला एका महिलेने मेसेज पाठवून तिच्याबद्दल अधिक माहिती विचारली. कारण, फोन केलेल्या महिलेच्या मुलीचा आणि टिक टॉक युजर मुलीचा डीएनए सारखाच होता.
या मुलीचा जन्म 'स्पर्म डोनर'च्या माध्यमातून झालेला आहे. मुलीच्या आईला स्वत:चं मूल जन्माला घालण्याची इच्छा होती म्हणून तिनं डोनेटेड स्पर्मचा वापर केला होता. या मुलीला तिच्या वडिलांबद्दल काहीच माहिती नव्हती. त्यामुळे तिने डीएनए टेस्ट (DNA Test) करून घेतली. त्याच्या आधारे ती अशा महिलांच्या शोधात बाहेर पडली, ज्यांनी स्पर्म डोनरची मदत घेतली होती. या शोध मोहिमेसाठी तिने एक फेसबुक ग्रुप तयार केला. आतापर्यंत तिला तिच्यासारखे डीएनए असणारी 50 मुल-मुली सापडली आहेत. म्हणजेच त्यांचा सर्वांचा जन्म एकाच व्यक्तीच्या स्पर्मपासून झाला आहे.
या मुलीला आतापर्यंत आपले 50 भाऊ-बहीण सापडले आहेत आणि त्यांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. या दरम्यान आता तिला एका वेगळ्याचं चिंतेनं ग्रासलं आहे. तिचा आणि तिच्या प्रियकराच्या डीएनएनं सारखा नसावा, म्हणजे झालं, असं तिचं म्हणणं आहे. तसं झालं तर तो तिचा भाऊ होईल. तिच्या टिकटॉक व्हिडीओवर एका युजरने कमेंटनं करून, आतापर्यंत तो स्पर्म डोनेशनच्या माध्यमातून 150 मुलांचा पिता झाल्याची माहिती दिली.
काही युरोपियन देशांमध्ये स्पर्म डोनेट करणं ही अतिशय सामान्य गोष्ट आहे. युनायटेड किंग्डममध्ये एक डोनर 10 कुटुंबांना आपलं स्पर्म देऊ शकतो. एप्रिल 2005 मध्ये 'द ह्यूमन फर्टिलायजेशन अँड अॅक्टमध्ये (एचएफई अॅक्ट) सुधारणा करण्यात आली आणि त्यानंतर स्पर्म डोनरला आपली संपूर्ण माहिती देणं बंधनकारक करण्यात आलं. त्यामुळे आता तिथे स्पर्म डोनरच्या सर्व माहितीची सरकार दप्तरी नोंद राहते. स्पर्म डोनेशनच्या माध्यमातून जन्मलेली मुलं 18 वर्षांची झाल्यानंतर आपल्या वडिलांची माहिती मिळवू शकतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Viral news