मुंबई, 25 मार्च- स्वतःच्या घराच्या गच्चीवर एक आकर्षक हिरवीगार बाग तयार करणं, हे प्रत्येक कोपऱ्यात कुंडीमध्ये झाडं लावण्याइतकं सोपं नाही; पण तमिळनाडूतल्या विरुधुनगरमधल्या एका इंजिनीअर तरुणाने स्वतःच्या घराच्या गच्चीवर सेंद्रिय शेतीचा प्रयोग केलाय. हा प्रयोग यशस्वी झाला असून, या तरुणाचा प्रवास प्रेरणादायी आहे. बाजारात मिळणारा रसायनमिश्रित भाजीपाला टाळण्यासाठी घराच्या गच्चीवर सेंद्रिय शेती करणाऱ्या या तरुणाचं नाव आहे भूमिनाथन.
तमिळनाडूमधल्या तिरपूरच्या लक्ष्मीनगर परिसरातले रहिवासी असलेले भूमिनाथन यांना लहानपणापासूनच शेतीची आवड होती. इंजिनीअरिंगचं शिक्षण घेतल्यानंतरही त्यांनी ही आवड जपली आहे. भूमिनाथन यांनी सुरुवातीला घराच्या गच्चीवर काही कुंड्यांमध्ये व टाकाऊ भांड्यांमध्ये भाजीपाला पिकवायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांना ‘टेरेस फार्मिंग’ची संकल्पना समजली व त्यांनी घराच्या गच्चीवर सेंद्रिय शेती हा प्रयोग यशस्वीपणे सुरू केला.
(हे वाचा: दिल्लीपेक्षा मुंबईच बेस्ट! शेतकऱ्याची ती Post व्हायरल, म्हणाले....)
याबाबत ‘न्यूज18’शी बोलताना भूमिनाथन म्हणाले की, ‘मी आता चार वर्षांपासून स्वतःच्या घराच्या गच्चीवर शेती करत असून, त्याची देखभाल करत आहे. शेती सुरू केल्यानंतर मी तिथेच पिकणारा भाजीपाला आमच्या घरी वापरत आहे. मी टोमॅटो, मिरची यांसारख्या भाज्या पिकवल्या आहेत. सध्या केळी, डाळिंब यांसारखी झाडंही मी मोठ्या कुंड्यांमध्ये लावली असून ती उत्तम स्थितीत आहेत.’ घराच्या गच्चीवर सेंद्रिय शेती सुरू करण्यासाठी मोठ्या जागेची आवश्यकता असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
भूमिनाथन पुढे म्हणाले, ‘माझी घराच्या गच्चीवर सेंद्रिय शेती करण्याची कल्पना अनेकांना आवडली आहे. परंतु अनेकांना भाड्याच्या घरात राहणं, गच्चीवर कमी जागा असणं, अशा विविध समस्यांमुळे अशा शेतीचा प्रयोग करता आला नाही; मात्र तुमच्या गच्चीवर कमी जागा असेल तर किमान 10 ते 15 कुंड्यामध्ये भाजीपाला लावून अशी शेती सुरू करता येऊ शकते.'
घरात सेंद्रिय शेती करून कमावतात लाखो रुपये
यापूर्वी उत्तर प्रदेशातल्या बरेलीमधल्या रामवीर सिंह नावाच्या व्यक्तीचा अशाच स्वरूपाचा प्रेरणादायी प्रवास समोर आला होता. रामवीर हे फक्त भाजीपाला पिकवून वर्षाला 70 लाख रुपये कमवतात. त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. रामवीर त्यांच्या तीन मजली घरात सेंद्रिय पद्धतीनं भाजीपाला पिकवतात. ते स्ट्रॉबेरी, फ्लॉवर यांसह विविध फळं आणि भाज्या घेतात. त्यांच्या तीन मजली घरात 10,000 झाडं आहेत. रामवीर यांची विम्पा ऑरगॅनिक आणि हायड्रोपोनिक्स नावाची कंपनीदेखील असून तिची उलाढाल लाखोंच्या घरात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Lifestyle, Viral news