नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर : कोणत्याही गोष्टीचा अति राग हा वाईटच. रागाच्या भरात माणूस काय करेल याचा नेम नाही. कधी भांडी आपटली जातात तर कधी हाताला मिळालेल्या वस्तू फेकून दिल्या जातात असाच एका महिलेला सुपरमार्केटमध्ये राग अनावर झाला आणि तीन चक्क एक दोन नाही तर 500 हून अधिक बाटल्या फोडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की संतापलेल्या एका महिलेनं रांगेत सगळ्या बाटल्या फोडून टाकल्या आहेत. साधारण 500 च्या आसपास या बाटल्या फोडल्याची माहिती मिळाली आहे. या बाटल्यांची साधारण किंमत 130, 000 डॉलर्स असल्याचं सांगितलं जात आहे. भारतीय रुपयात विचार करायचा झाला तर 95 लाखांच्या आसपास ही किंमत आहे.
ही घटना इंग्लंडमधील अल्दी सुपरमार्केटमधील असल्याचं सांगितलं जात आहे. या महिलेनं या बाटल्या का फोडल्या याचं कारण अद्याप समोर येऊ शकलं नाही मात्र या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
या महिलेला कुणीच का थांबवत नाही? ही महिला कोण आहे? या महिलेवर कोणतीही कारवाई का केली जात नाही? असे अनेक प्रश्न हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर युझर्सनी विचारले आहेत. अनेक युझर्सनी या महिलेनं हे धक्कादायक पाऊल का उचललं असाव यावर देखील चर्चा केल्याचं पाहायला मिळालं आहे. या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळावरून महिलेला ताब्यात घेतलं असून सध्या तिची चौकशी सुरू आहे.