कोरोना लस घेण्यासाठी नवरीच्या वेशभूषेत पोहोचली महिला, कारण जाणून व्हाल थक्क

कोरोना लस घेण्यासाठी नवरीच्या वेशभूषेत पोहोचली महिला, कारण जाणून व्हाल थक्क

एक महिला पांढरा वेडिंग गाउन परिधान करून कोरोना लस (Corona Vaccine) घ्यायला गेली. रिसेप्शन समारंभासाठी तिने व्हाइट वेडिंग गाउन (White Wedding Gown) खरेदी केला होता.

  • Share this:

नवी दिल्ली 19 एप्रिल : कोरोना लस घ्यायला जाताना कशा प्रकारचे कपडे घालावेत, असा काही वेगळा विचार कोणी करणार नाही. कारण त्यासाठी काही वेगळी नियमावली नाही आणि तशी नियमावली असण्याची काही गरजही नाही. नेहमी घराबाहेर पडताना ज्या प्रकारचे कपडे घातले जातात, तसेच कपडे घालून कोणीही लसीकरणासाठी जाईल ना! पण बाल्टिमोरमधली (Baltimore) एक महिला मात्र याला अपवाद ठरली आहे. ती चक्क पांढरा वेडिंग गाउन परिधान करून कोरोनाप्रतिबंधक लस (Corona Vaccine) घ्यायला गेली.

साराह स्टडले असं तिचं नाव. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात तिचा विवाह झाला. विवाहाच्या रिसेप्शन समारंभासाठी तिने व्हाइट वेडिंग गाउन (White Wedding Gown) खरेदी केला होता. मात्र, कोरोनाच्या साथीमुळे समारंभ रद्द करावा लागला. त्यामुळे तो गाउन परिधान करण्याची संधीच मिळाली नाही. म्हणूनच तिने लसीकरणावेळी (Vaccination)तो वेडिंग गाउन घातला आणि तो क्षण संस्मरणीय केला. एम अँड टी बँक स्टेडियममध्ये झालेल्या लसीकरण कार्यक्रमात हा गाउन परिधान करून तिने कोरोना लस घेतली.

साराह स्टडली (Sarah Studley) आणि ब्रायन होर्लोर (Brain Horlor) यांचा साखरपुडा नोव्हेंबर 2019मध्ये झाला. वर्षभरानंतर म्हणजे नोव्हेंबर 2020 मध्ये त्यांनी विवाह करायचं ठरवलं. त्या समारंभाला 100 लोक उपस्थित राहणार होते; पण कोरोनाच्या साथीमुळे सगळं नियोजन बिघडलं आणि त्या दाम्पत्याला एका छोट्या समारंभात विवाहबद्ध व्हावं लागलं. फक्त कुटुंबीय आणि अगदी जवळच्या मित्रमंडळींसह भोजनाचा आस्वाद घेता आला. त्यामुळे या दाम्पत्याला बाकीच्या मित्रमंडळींसाठी रिसेप्शन पार्टी आयोजित करायची होती. कारण सगळ्यांना लग्नाला उपस्थित राहाता आलं नव्हतं.

येत्या जून महिन्यात तो समारंभ करण्याबद्दल त्यांचा विचार सुरू होता. त्यासाठी हा व्हाइट वेडिंग गाउन साराहने खरेदी केला होता; मात्र अद्यापही कोरोनाच्या परिस्थितीत फारशी सुधारणा झालेली नाही. त्यामुळे अजून दोन-तीन महिन्यांत किती सुधारणा होईल, याचा अंदाज नाही. असा विचार करून शेवटी त्या दाम्पत्याने रिसेप्शन पार्टी रद्दच करायचं ठरवलं. त्यामुळे त्या संस्मरणीय प्रसंगासाठी घेतलेला गाउन वापरलाच जाणार नव्हता. म्हणूनच साराहने विचार केला, की लसीकरण कार्यक्रम हाच तो गाउन परिधान करण्यासाठी योग्य सोहळा असू शकतो. शिवाय, एका महिलेने लसीकरणासाठी फुल लेंग्थ सेक्विन गाउन वापरल्याचं ट्विटही तिच्या वाचनात आलं होतं. त्यातून प्रेरणा घेत तिने स्वतःही लसीकरणासाठी जाताना वेडिंग गाउन घालायचं ठरवलं.

'लस हा काही कोरोनाचा शेवट नव्हे किंवा त्यावरचा उपायही नव्हे; पण तो टर्निंग पॉइंट नक्कीच आहे. लस घेतल्यामुळे मला माझ्या 81वर्षांच्या वडिलांना कोणतीही काळजी मनात न बाळगता मिठी तरी मारता येणार आहे,' असं साराह म्हणाली. साराहचा पती होर्लोर याने सांगितलं, की लस घेण्यासाठी साराहला वेडिंग गाउन घालून आल्याचं पाहिल्यावर आश्चर्याचा सुखद धक्काच बसला. साराहचे वेडिंग गाउन घालून लस घेतानाचे फोटो अनेकांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यावर अनेकांच्या प्रतिक्रिया येत आहेत आणि ते फोटो अनेकांकडून पुन्हा शेअरही केले जात आहेत.

Published by: Kiran Pharate
First published: April 19, 2021, 1:03 PM IST

ताज्या बातम्या