लंडन, 3 नोव्हेंबर: बहुतांश व्यक्ती टॉयलेट सीटवर (Toilet Seat) बसण्यापूर्वी ती व्यवस्थित पाहत नाहीत. टॉयलेट सीट वरच्या बाजूने स्वच्छ दिसली, की थेट त्यावर बसलं जातं. मात्र असं करणं धोकादायक ठरू शकतं. टॉयलेट सीटमध्ये साप आढळल्याची (Snakes Hidden In Toilet Seat) अनेक प्रकरणं आतापर्यंत तुम्ही वाचली किंवा पाहिली असतील. ब्रिटनमधील एका महिलेच्याबाबतीत असाच काहीसा प्रकार घडला आहे. तिला टॉयलेट सीट वापरणं महागात पडलं आहे.
जो केन्यॉन (Jo Kenyon) असं या महिलेचं नाव असून ती एक रेडिओ प्रोड्युसर आहे. तिनं टॉयलेट व्यवस्थित न पाहता त्याचा वापर केला. त्या वेळी सीटखाली दडून बसलेल्या एक विषारी कोळ्यानं (Spider) तिला दंश केला. यानंतर तीव्र वेदना जाणवू लागल्यानं सरळ तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं.
काही दिवसांपूर्वी, 34 वर्षीय जो नेहमीप्रमाणं टॉयलेट सीटवर जाऊन बसल्या मात्र त्यानंतर त्यांना अचानक तीव्र वेदना होऊ लागल्या. वेदना असह्य झाल्यानं तिने हॉस्पिलटमध्ये धाव घेतली. आठवडाभराच्या काळात तिला तीन वेळा अॅडमिट करावं लागलं आहे.
टॉयलेट सीटखाली दडून बसलेल्या कोळ्यानं तिच्या जांघेजवळ चावा घेतला होता. तो कोळी इतका विषारी होता, की त्यावर औषधोपचारदेखील लवकर परिणामकारक ठरत नव्हते. त्या ठिकाणी मोठी जखमसुद्धा झाली होती त्यामुळं तिला चालताना आणि झोपताना त्रास सहन करावा लागत होता. जोला नोबल फॉल्स विडो (Noble false widow) जातीच्या कोळ्यानं चावा घेतल्याचा अंदाज आहे.
कोळी चावल्यानंतर जो लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये आली नसती तर कदाचित तिचा जीवदेखील गेला असता, अशी माहिती डॉक्टरांनी दिली. आता तिची जखम बरी झाली आहे. मात्र, तरीदेखील तिला उठता-बसताना त्रास सहन करावा लागतो. लीड्समध्ये राहत असलेल्या जोला लहानपणापासूनचं कोळ्यांची भीती वाटायची. आता तिच्यासोबत झालेल्या घटनेनंतर तर तिला कोळ्याचं नावदेखील नकोसं झालं आहे.
'ज्या दिवशी मला कोळी चावला, त्या दिवशी सकाळी मी अर्धवट झोपेत असतानाच टॉयलेट सीटवर जाऊन बसले होते. त्यानंतर माझ्या मांडीमध्ये वेदना जाणवू लागल्या. एखाद्यानं पेटलेल्या सिगारेटनं मला चटका दिल्यासारखं वाटत होतं. त्यानंतर मी टॉयलेट सीट पाहिली, तर त्यावर एक कोळी फिरत होता. वेदनांची तीव्रता खूपच वाढल्यानं मी लगेच डॉक्टरकडे गेले. औषधोपचार घेतल्यानंतरही वेदना सुरूच होत्या; मात्र तीव्रता काहीशी कमी झाली होती,' अशी माहिती जोनं दिली. जोबाबत झालेली घटना समोर आल्यापासून अनेकांनी धसका घेतला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Viral news