सिलचर, 03 फेब्रुवारी: आजकाल पार्लरमध्ये जाणं अनेकांसाठी खूप नेहमीची गोष्ट झाली आहे. स्त्री-पुरुष दोघांसाठीही विविध सुविधा पार्लरमध्ये उपलब्ध असतात. मात्र पार्लरमध्ये जाणं एका डॉक्टर महिलेला फारच महागात पडलं आहे. तिने केलेल्या फेशियल (Facial) नंतर झालेली तिच्या चेहऱ्याची अवस्था अत्यंत बिकट आहे. डॉ. बिनीता नाथ यांच्याबरोबर हा प्रकार घडला.
सध्या त्या इटलीमध्ये राहतात, पोस्ट डॉक्टरल स्टडीसाठी त्या युनिव्हर्सिटी ऑफ रोममध्ये गेल्या होत्या. त्या काही दिवसांपूर्वी त्यांचं मुळ शहर असणाऱ्या सिलचरमध्ये होत्या. गुवाहाटीमध्ये एका लग्नाला हजेरी लावण्यापूर्वी त्यांनी सराडा पार्लरला भेट दिली. त्या दरम्यान त्यांच्याबरोबर हा प्रकार घडला.
त्यांनी फेसबुकवर एक व्हिडीओ शेअर करत घडला प्रकार सांगितला आहे. डॉ. बिनीता यांनी या व्हिडीओमध्ये असे म्हटले आहे की, त्याठिकाणी आधी त्यांच्या चेहऱ्यावर डिटॅनिंग करण्यात आले. त्यानंतर ब्लिच लावण्यात आले, पण ते करताना संपूर्ण चेहऱ्यावर काहीतरी गरम टाकल्यासारखे वाटत असल्याचे त्यांनी त्या पार्लरमधील कर्मचाऱ्यांना सांगितले. त्यांनी लगेचच चे ब्लिच हटवण्यास जरी सांगितलं असलं तरी संपूर्ण काढून टाकण्यात 5 मिनिट गेल्याचं त्या सांगतात. त्या पार्लरलच्या मालकाने देखील त्यांना नीट उत्तर दिली नसल्याचं त्यांनी या व्हिडीओत म्हटलं आहे. त्यांनी असे देखील म्हटले आहे की, लग्नानंतर पहिल्यांदाच त्या एखाद्या पार्लरमध्ये जात होत्या.
हा प्रकार झाल्याच्या तिसऱ्या दिवशी बिनीता यांनी हा व्हिडीओ बनवल्याचं व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. त्यांनी असं म्हटलं आहे की, व्हिडीओमध्ये जेवढा खराब त्यांचा चेहरा दिसतोय त्याही पेक्षा भयंकर परिस्थिती आहे.
त्यांनी त्यांच्या मैत्रिणींना आवाहन केले आहे की, जर तुम्ही त्या पार्लरमध्ये गेलात तर एक्सपर्ट्स कडूनच या गोष्टी करून घ्या. कारण बिनीता यांच्या मते त्याठिकाणी असणारे कर्मचारी अजिबात या विषयातील तज्ज्ञ नव्हते. डॉक्टरकडे गेल्यानंतर त्यांनी या खुणा जळाल्याच्या असल्याचे म्हटले आहे. या जखमांवर उपचार सुरू असून पूर्णपणे बरं व्हायला आणखी काही कालावधी जाईल, असंही त्यांनी या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.