मुंबई, 29 मार्च : ड्रायव्हिंग लायसेन्स मिळवण्यासाठी लेखी, तसंच प्रात्यक्षिक परीक्षा द्यावी लागते. परदेशात तर वाहन चालवण्याचा परवाना मिळवण्यासाठीची परीक्षा खूप कठीण असते. त्याबाबतचे कायदेही खूप कठोर असतात. ते पार करून ड्रायव्हिंग लायसेन्स मिळालं तर निश्चितच आनंद होतो. एका दक्षिण कोरियन महिलेला तर ड्रायव्हिंग लायसेन्स मिळाल्याचा आनंद इतका मोठा होता की तिच्याइतकाच ड्रायव्हिंग स्कूलच्या शिक्षकांनीही सुटकेचा निःश्वास टाकला. कारण तिला हे लायसेन्स मिळवण्यासाठी तब्बल 960 वेळा परीक्षा द्यावी लागली. ही घटना 2010मध्ये घडली होती; मात्र त्या संदर्भातली पोस्ट आता पुन्हा एकदा व्हायरल होतेय. 'एनडीटीव्ही'ने त्याबाबतचं वृत्त दिलं आहे.
न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, चा सा-सून या दक्षिण कोरियन महिलेच्या ड्रायव्हिंग लायसेन्स मिळवण्याच्या प्रयत्नांना 2005मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी मिळाली होती. ही घटना 18 वर्षांपूर्वीची असली तरी आता ‘रेडिट’वर ही पोस्ट पुन्हा एकदा व्हायरल होते आहे. चा सा-सून यांनी 2005मध्ये पहिल्यांदा लेखी परीक्षा दिली. त्यात अपयश आल्यावर पुढची 3 वर्षं त्या आठवड्यातले पाचही दिवस रोज ती परीक्षा देत होत्या. त्यानंतर आठवड्यातून दोनदा त्या परीक्षा देऊ लागल्या. त्यांच्या प्रयत्नांना यश येत नव्हतं; पण त्यांनी हार मानली नाही. तब्बल 860 वेळा लेखी परीक्षा दिल्यानंतर अखेर त्या उत्तीर्ण झाल्या. लेखी परीक्षेनंतर प्रात्यक्षिक परीक्षा जास्त अवघड असते. ही परीक्षाही त्यांना 10 वेळा द्यावी लागली. त्यामुळे 960 वेळा परीक्षा दिल्यानंतर त्यांना अखेर ड्रायव्हिंग लायसेन्स मिळालं. परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी 2010 साल उजाडलं. तोपर्यंत त्या 69 वर्षांच्या झाल्या होत्या.
घराच्या बाहेर दररोज यायचा विचित्र वास, CCTV तपासताच समोर आलं धक्कादायक सत्य
चा सा-सून यांनी ड्रायव्हिंग लायसेन्स मिळवण्यासाठी चिकाटीनं प्रयत्न केले. या परीक्षा देण्यासाठी त्यांनी 11 हजार पौंड म्हणजे 11,15,273 रुपये खर्च केले. त्यांच्या यशाबाबत ड्रायव्हिंग स्कूलच्या प्रशिक्षकांनी टाइम्सला 2010मध्ये सांगितलं होतं की, “त्यांना लायसेन्स मिळाल्यावर आम्हाला इतका आनंद झाला, की आम्ही त्यांना मिठी मारली. फुलं दिली. आमच्या मनावरचं खूप मोठं ओझं हलकं झाल्यासारखं वाटलं. त्या इतक्या जिद्दीनं प्रय़त्न करत होत्या, की तुम्ही परीक्षा देणं सोडून द्या असं आम्ही त्यांना सांगू शकलो नाही.”
चा सा-सून यांच्या प्रेरणादायी प्रवासामुळे त्यांना राष्ट्रीय सेलिब्रिटीसारखी प्रसिद्धी मिळाली. त्यांच्या या जिद्दीसाठी ह्युंदाई या दक्षिण कोरियन कार कंपनीनं त्यांना एक गाडी भेट म्हणून दिली. ही पोस्ट व्हायरल झाल्यावर आता त्यावर युझर्सच्या भरपूर प्रतिक्रिया मिळत आहेत. त्या खरोखर हा परवाना मिळवण्यासाठी पात्र होत्या का, यावरही युझर्स चर्चा करत आहेत. ‘एखाद्या व्यक्तीला त्या परीक्षेत 10 पेक्षा जास्त वेळा अपयश आलं, तर त्यापुढे त्या व्यक्तीला ड्रायव्हिंगची परवानगी कधीच मिळू नये,’ असं एकानं म्हटलंय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Viral news