लखनऊ 17 मार्च : लग्नाचं एक अजब प्रकरण नुकतंच समोर आलं आहे. यात उत्तर प्रदेशातील एटामध्ये फसवणूक करून दुसरं लग्न करणाऱ्या दोन मुलांच्या बापाचं खोटं तेव्हा समोर आलं जेव्हा त्याची पहिली पत्नी आणि तिच्या भावांनी मंडपात गोंधळ घातला. त्यांनी नवरदेवाला मारहाणही केली. यानंतर वधूपक्षाकडील लोकांनी वराला आणि त्याच्या पालकांना पोलिसांच्या ताब्यात दिलं. वधूच्या वडिलांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करून पोलिसांनी वराला तुरुंगात पाठवलं आहे. तर, संधी मिळताच फरार झालेल्या कुटुंबीयांचा शोध सुरू केला आहे.
दुसऱ्या लग्नासाठी एटा येथे आलेल्या कपिंजल यादव याचा पहिला विवाह 18 एप्रिल 2012 रोजी कासगंज रहिवासी श्वेता यादवसोबत मोठ्या थाटामाटात झाला. श्वेताच्या वडिलांनी लग्नात मोठा खर्च केला होता आणि 20 लाख रुपयेही दिले होते. कपिंजलला त्याची पहिली पत्नी श्वेतापासून दोन मुलीही आहेत. दोन मुलींनंतर अचानक कंपिजल आणि त्याच्या कुटुंबीयांच्या वागण्यात बदल झाला, त्यानंतर श्वेता आपल्या दोन्ही मुलींसह माहेरी आली.
लग्नानंतर बायकोला आली दाढी-मिशी; नवऱ्याला मोठा धक्का, अन् रागात त्याने...
पत्नी श्वेता कासगंजला जाताच कपिंजल आणि त्याच्या कुटुंबीयांनी एटामध्ये लग्न ठरवलं. 15 मार्च रोजी मोठ्या थाटामाटात वरात घेऊन कपिंजल दखिनी रिसॉर्टवर पोहोचला. सायंकाळी उशिरापर्यंत लग्नाचे सर्व विधी अगदी आरामात पार पडत होते, मात्र वरमाळेच्या कार्यक्रमादरम्यान पहिली पत्नी श्वेता आणि तिच्या भावाने लग्नाला विरोध करत मंडपात गोंधळ घातला. त्याचवेळी त्यांनी कपिंजलला बेदम मारहाण केली आणि तोतया वराचा सगळा खेळ उधळला.
हा सगळा प्रकार कळताच नववधू आणि तिच्या वडिलांच्या पायाखालची जमीन सरकली. कपिंजलसोबत लग्नाला वधूने नकार दिला. या साऱ्या प्रकारामुळे दु:खी झालेल्या वधूच्या वडिलांनी पोलिसांना बोलावून वराला आणि त्याच्या कुटुंबीयांना पोलिसांच्या ताब्यात दिलं.
दुसरीकडे, पहिली पत्नी श्वेताचा भाऊ मनोज कुमार याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी नवरदेव आणि त्याच्या कुटुंबीयांवर गुन्हा दाखल करून फसवणूक करणाऱ्या वराला कारागृहात पाठवलं. तर, संधी पाहून पळून गेलेल्या नऊ जणांचा शोध पोलीस ठाण्याने सुरू केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Viral news, Wedding