मुंबई, 21 डिसेंबर : जर तुम्ही कधी हॉस्पिटलमध्ये (Hospital) गेला असाल तर तुमच्या लक्षात आलं असेल की हॉस्पिटलमध्ये पांढऱ्या रंगाव्यतिरिक्त (White Color) हिरवा (Green) आणि निळा (Blue) रंग प्राधान्यानं वापरला जातो. हॉस्पिटलमध्ये पडदे, चादरी आणि गाद्यांची कव्हर हिरव्या किंवा निळ्या रंगाची असतात. तसेच डॉक्टर्स देखील पांढऱ्या रंगाव्यतिरिक्त निळ्या किंवा हिरव्या रंगाच्या पेहेरावात दिसतात. या पेहेरावाला स्क्रब (Scrubs) असं म्हणतात. हॉस्पिटलमध्ये या रंगांचा प्राधान्यानं वापर करण्यामागे काय कारण आहे? हॉस्पिटलमध्ये लाल, पिवळ्या किंवा काळ्या रंगाचा वापर का केला जात नाही, यामागील कारण तुम्हाला माहिती आहे का? याबाबतची माहिती आता जाणून घेऊया...
हॉस्पिटलमध्ये पांढऱ्या रंगाचा वापर करण्यामागचं कारण अगदी सरळ आणि स्वाभाविक आहे, आणि ते कदाचित तुम्हाला माहिती देखील असेल. पांढरा रंग हा स्वच्छता (Cleanness) आणि शांतीचं (Peace) प्रतीक आहे. त्यामुळे हॉस्पिटलच्या भिंती, डॉक्टरांचा कोट, बऱ्याचदा चादरी आणि गाद्या पांढऱ्या रंगाच्या असतात. रुग्णाला यातून स्वच्छतेचा अनुभव मिळावा हा उद्देश असतो. परंतु, हिरव्या आणि निळ्या रंगाच्या वापरामागचं कारण हे रोचक आणि अनोखं आहे.
पूर्वी होत असे पांढऱ्या रंगाच्या कपड्यांचा वापर
लाईव्ह सायन्स वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वी डॉक्टर पांढऱ्या रंगाचा स्क्रब वापरत. परंतु, 1900 च्या दशकाच्या सुरवातीला डॉक्टरांना पांढऱ्या स्क्रबचे धोके समजले. थंडीच्या दिवासात जसं आजूबाजूला बर्फ पाहून जसे डोळे चमकतात तसे रक्ताचा लाल रंग खूप काळ पाहिल्यानंतर लगेच पांढऱ्या पोशाखाकडे पाहिलं तर क्षणभर डोळे चमकतात.
हिरव्या आणि निळ्या रंगामुळे मिळतो डोळ्यांना आराम
शस्त्रक्रियेदरम्यान (Surgery) सहकारी डॉक्टरांकडे बराच वेळ पाहवं लागत असल्यानं तीव्र डोकेदुखी जाणवू लागते, अशी तक्रार डॉक्टर नेहमी करत. डोळे चमकत असल्यानं रुग्णावरील शस्त्रक्रियेदरम्यान अडचणी येऊ शकतात. ही बाब लक्षात घेऊन डॉक्टरांनी निळ्या किंवा हिरव्या रंगाचा स्क्रब वापरणं सुरू केलं. लाल रंगावरून नजर हटल्यानंतर क्षणार्धात निळ्या किंवा हिरव्या रंगाकडे पाहिलं तर डोळ्यांना (Eye) आराम मिळतो आणि डोळ्यावर ताण देखील येत नाही. याचे कारण असे आहे की पांढरा रंग सर्व प्रकाश प्रतिबिंबीत करतो. मात्र निळ्या किंवा हिरव्या रंगामुळे हे होत नाही. लाल रक्त आणि हिरव्या, निळ्या रंगाचे कपडे एकामागून एक क्रमानं पाहिल्यास कॉन्ट्रास्ट (Contrast) तयार होतो. आणि त्यामुळे दृष्टीवर कोणताही वाईट परिणाम होत नाही.
हिरवा, निळा रंग इल्युजन प्रतिबंधित करतो
पांढरा किंवा इतर कोणताही रंग न वापरण्यामागील एक कारण म्हणजे रंगांची वारंवारता आणि भ्रम (Illusion) प्रभाव. जेव्हा डॉक्टर लाल रंगाचे रक्त आणि अन्य अवयवांवरून नजर हटवून पांढऱ्या रंगाकडे पाहतात, तेव्हा त्यांच्या डोळ्यात लाल रंग आणि शारीरिक अवयवांचा भ्रम बराच काळ टिकून राहतो. डोळ्यावर फ्लॅश लाइट (Flash Light) चमकल्यावर जसा भास होतो, हा प्रकार अगदी तसाच असतो.
रुग्णालयात ठराविक रंगांचा वापर का होतो हे आता तुमच्या लक्षात आलं असेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.