मुंबई, 30 डिसेंबर : छोट्या मुलांना ज्यूस (Juice) प्रचंड आवडतं. फ्रूट ज्यूस (Fruit Juice) लहान मुलांना किंवा कोणालाही सहज पिता यावं आणि त्याची वाहतूक सोपी व्हावी म्हणून कागदी बॉक्सेसमध्ये पॅक (Juice Paper Box) करून ते विकलं जातं. ज्यूसचे कागदी बॉक्स सहज हाताळता येतात आणि दिसायलाही छान दिसतात. बाटलीपेक्षा पटकन नजरेतही भरतात. फ्रूटी, ट्रॉपिकाना यांसारखे ज्यूस प्रॉडक्ट्स तुम्ही पाहिले असतील. ते कागदी बॉक्समध्येच पॅक केलेले असतात. या कागदी बॉक्सच्या वरच्या बाजूला दोन्ही बाजूंना त्रिकोणी फ्लॅप्स (Triangular Flaps of Juice Boxes) असतात. डिझाइन म्हणून तर ते छान दिसतातच; पण ते फ्लॅप्स केवळ डिझाइन म्हणून दिलेले नसतात. त्यांचा उद्देश काही वेगळाच असतो.
कागदी ज्यूस बॉक्सना त्रिकोणी फ्लॅप्स बसवण्यामागचं खरं कारण अनेकांना माहितीच नसेल. ते फ्लॅप्स बॉक्सच्या वरच्या दोन्ही बाजूंना दुमडलेले असतात. अनेक जण ते फ्लॅप्स वर न करताच ज्यूस पिऊन टाकतात; मात्र वास्तविक ज्यूस पिण्यापूर्वी ते फ्लॅप्स वर करणं आवश्यक असतं. कारण ते फ्लॅप्स लहान मुलांना तो बॉक्स पकडणं सोपं जावं म्हणून दिलेले असतात.
अनेकदा असं होतं, की लहान मुलं ज्यूस पिताना हे कागदी बॉक्स हलवत राहतात. त्यामुळे त्या बॉक्सला असलेल्या छोट्या छिद्रातून ज्यूस बाहेर येऊ शकतं. ते टाळण्यासाठी त्या बॉक्सला फ्लॅप्स बसवलेले असतात. हे फ्लॅप्स बाहेर काढून दोन्ही हातांत धरून मुलं ज्यूस प्यायली, तर आतलं ज्यूस बाहेर सांडत नाही.
ज्यूस बॉक्स सहजतेने पकडता (Holding Boxes) यावा, म्हणून हे फ्लॅप्स दिलेले असतात. त्याशिवाय आणखी एक कारणही आहे. बॉक्सच्या ज्या कोनांवर फ्लॅप्स दुमडून ठेवलेले असतात, त्या कोनांमध्ये थोडं ज्यूस अडकून राहिलेलं असतं. ज्यूस पिण्यापूर्वी ते फ्लॅप्स वर केले, तर तिथे अडकून राहिलेलं ज्यूस पूर्णपणे बॉक्समध्ये येतं. त्यामुळे बॉक्समधल्या ज्यूसचा एकही थेंब वाया न घालवता पिणं शक्य होतं. ज्यूस प्यायल्यानंतर हे डबे जेव्हा कचऱ्यात फेकले जातात, त्यानंतर पुनर्वापर अर्थात रिसायकलिंग (Recycling) केलं जातं. फ्लॅप वर करून ज्यूस प्यायलेलं असेल, तर त्या बॉक्समध्ये ज्यूस राहत नाही. त्यामुळे रिसायकलिंगच्या वेळी त्यात राहिलेलं ज्यूस काढून टाकण्याचं कामही वाचतं. म्हणून अशा बॉक्समधून ज्यूस पिताना ते फ्लॅप्स उघडूनच प्यावं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.