Home /News /viral /

आज स्वप्नात काय पाहणार? Dream Lab मध्ये तयार केलं जातंय अनोख उपकरण, वाचा काय आहे ही कल्पना

आज स्वप्नात काय पाहणार? Dream Lab मध्ये तयार केलं जातंय अनोख उपकरण, वाचा काय आहे ही कल्पना

शास्त्रज्ञ आता स्वप्नं हॅक करण्याच्या प्रयत्नात आहेत.

    टीव्ही किंवा व्हिडिओ पाहताना काय पाहायचं, काय टाळायचं, याचा रिमोट कंट्रोल आपल्या हाती असतो; पण आपण स्वप्नात पाहत असलेला सिनेमा मात्र अनेकदा आपल्याला पूर्ण पाहता येत नाही. किंवा स्वप्नातला एखादा भयानक सिनेमा जास्त वेळ पाहावा लागतो, असंही अनेकदा घडतं. पण प्रत्यक्षातल्या टीव्हीप्रमाणेच स्वप्नं दाखवणाऱ्या या 'टीव्ही'चा रिमोट कंट्रोलही तुमच्या हातात असला तर? ही एखाद्या साय-फाय (Sci-fi) सिनेमाची गोष्ट वाटतेय ना? पण तसं नाहीये. अमेरिकेतले शास्त्रज्ञ असं एक उपकरण विकसित करत आहेत, की ते परिधान करून झोपल्यावर तुम्ही चांगली स्वप्नं (Dreams) जास्त काळ पाहू शकाल किंवा वाईट स्वप्नं डिलीट करू शकाल. 'आज तक'नं याबाबतचं वृत्त दिलं आहे. एखादा कम्प्युटर, वेबसाइट किंवा सोशल मीडिया अकाउंट हॅक करणं ही गोष्ट सगळ्यांनाच माहिती आहे. अमेरिकेतल्या मॅसाच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी - MIT) या संस्थेचे शास्त्रज्ञ आता स्वप्नं हॅक करण्याच्या प्रयत्नात आहेत. एमआयटीच्या ड्रीम लॅबमध्ये (Dream Lab) एक उपकरण तयार केलं जात आहे. त्याद्वारे स्वप्नं हॅक (Hack) करता येणं शक्य आहे. त्यामुळे स्वप्न बदलणं आणि त्यावर नियंत्रण मिळवणं शक्य होऊ शकेल. थोडक्यात म्हणजे स्वप्नात जे काही दाखवलं जाणार आहे, हे तुमच्या मर्जीने दिसेल. एमआयटी ड्रीम लॅबचे शास्त्रज्ञ अॅडम होरोविट्झ यांनी सांगितलं, की स्वप्नांवर नियंत्रण मिळालं, तर व्यक्तिमत्त्व अधिक सुधारेल असं वाटतं. त्यामुळे रात्री वाईट स्वप्न पाहून दुसऱ्या दिवसाची सकाळ वाईट जाणार नाही. अनेकदा वाईट स्वप्नांचा दुष्परिणाम दीर्घकाळ टिकून राहतो. ते टाळता येऊ शकेल. त्यामुळे माणसाच्या मेंदूची क्षमता वाढेल, अशीही आशा आम्हाला आहे. शास्त्रज्ञ तयार करत असलेल्या उपकरणाचं नाव डोरिमो (Dorimo) असं आहे. हे उपकरण झोपताना हातांवर परिधान केलं जातं. त्यात अनेक सेन्सर्स (Sensors) लावलेले आहेत. माणूस पूर्ण सुषुम्नावस्थेत आहे की नाही, याचा अंदाज हे उपकरण घेतं. आतापर्यंत या उपकरणाची चाचणी 50 जणांवर घेण्यात आली असून, अद्याप त्यात सुधारणा करणं बाकी आहे. झोपेत हिप्नागोगिया (Hypnagogia) नावाची स्थिती असते, त्या कालावधीत माणसाला स्वप्नं पडतात. चांगली चित्रं दिसतात, आवाज ऐकू येतात किंवा आभास होतात. या स्थितीत अनेकदा माणसाला अशी स्थिती दिसते, की जी त्या माणसाने पूर्वी अनुभवली आहे किंवा ती अनुभवण्याची माणसाची इच्छा आहे. हिप्नागोगिया स्थितीत मेंदूत उमटणाऱ्या चित्रांवर नियंत्रण मिळवण्यासाठी डोरिमो हे उपकरण मदत करतं. डोरिमोमध्ये प्री-रेकॉर्डेड मेसेजेस आहेत. उपकरणाला टायगर हा शब्द ऐकवण्यात आला. त्यानंतर ते उपकरण लावलेल्या सर्वांच्या स्वप्नात वाघ आला. त्यानंतर या उपकरणाच्या मदतीने या ५० व्यक्तींची स्वप्न पाहण्याची पद्धत, परिणाम आणि त्यात झालेल्या बदलांची नोंद करण्यात आली. हे एक उत्तम उपकरण असल्याची प्रतिक्रिया युनिव्हर्सिटी ऑफ माँट्रियलमधील सायकिअॅट्री प्रोफेसर टोर निल्सन यांनी व्यक्त केली आहे. प्रत्येकाला आपलं स्वप्न जगायचं असतं. त्यावर नियंत्रण मिळवायचं असतं. या उपकरणाच्या साह्याने तुम्ही उडू शकता, गाऊ सकता, फिरू शकता किंवा सेक्सही करू शकता. याद्वारे दिसणारी स्वप्न व्हर्च्युअल रिअॅलिटी (Virtual Reality) तंत्रज्ञानापेक्षा अधिक स्पष्ट असतील, असं त्यांचं म्हणणं आहे. हे उपकरण एखादा आवाज ऐकवून किंवा कोणत्या तरी प्रकारचा बायोलॉजिकल संदेश पाठवून स्वप्नावर नियंत्रण मिळवेल; मात्र त्या वेळी एखाद्या व्यक्तीच्या मानसिक स्थिती नेमकी काय आहे, हे जाणून घेणं सध्या तरी अवघड आहे. झोपेतल्या अर्धसुषुम्नावस्थेतही एक वेगळ्या प्रकारचा इंटेलिजन्स (Intelligence) असतो. ते शिकण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत. ते दाबून टाकण्याचा प्रयत्न आम्ही करत नाही. कारण या स्थितीत तसे काही बदल करणं घातकही ठरू शकतं, असं युनिव्हर्सिटी ऑफ अॅरिझोनामधील स्वप्नविषयक तज्ज्ञ रुबिन नायमन यांनी सांगितलं.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    पुढील बातम्या