मुंबई, 22 नोव्हेंबर : भारतात गेल्या काही वर्षांत मद्यपानाला विशेष वलय प्राप्त झालं आहे. मद्यपान करणं ही तरुणांमध्ये एक फॅशन बनली आहे. मद्यपान करणं आरोग्यासाठी घातक असलं, तरी मद्यपानाचं आकर्षण कमी होण्याऐवजी वाढत चाललं आहे. जगभरातल्या विविध देशांमध्ये, प्रांतांमध्ये मद्यपान वेगवेगळ्या पद्धतीनं केलं जातं. काही ठिकाणी तर मद्यपान करण्याच्या विशेष प्रथा, परंपरादेखील पाहायला मिळतात. काही ठिकाणी शूजमधून मद्य घेतलं जातं, तर काही ठिकाणी ग्लासाला हात न लावता ड्रिंक घेण्याची पद्धत आहे. जगभरातल्या मद्यपानाच्या काही खास पद्धतींविषयी सविस्तर जाणून घेऊ या.
जगभरात मद्यप्रेमींची संख्या काही कमी नाही. वेगवेगळे देश आणि प्रांतातल्या नागरिकांच्या मद्यपानाच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. भारतातही मद्यपानाच्या काही विचित्र पद्धती पाहायला मिळतात. अनेक जण ग्लासात मद्य घेतल्यानंतर त्यात बोट बुडवून काही थेंब हवेत शिंपडतात. यामुळे अतृप्त आत्मे आणि पूर्वजांना शांती लाभते, असं मानलं जातं. काही जण मद्याची बाटली उघडल्यानंतर काही थेंब जमिनीवर ओतून पितरांप्रति आदर व्यक्त करतात.
विवाह सोहळा आणि वाइन या दोन्ही गोष्टींचं एक विचित्र आणि परंपरागत नातं नायजेरियात पाहायला मिळतं. तिथं नववधूचे वडील तिला एका कपात वाइन देतात. त्यानंतर वधूला लग्नाला आलेल्या मंडळींमधून आपला वर शोधायचा असतो. जेव्हा वधू आपला वर शोधून त्याच्या हातात वाइनचा ग्लास देण्यात यशस्वी ठरते, तेव्हा विवाह झाला असं मानण्यात येतं.
ही गोष्ट ऐकायला काहीशी विचित्र वाटेल, पण ती खरी आहे. दर वर्षी 29 जून रोजी स्पेनमधल्या हारो शहरात एका `वाइन वॉर`चं आयोजन केलं जातं. या वेळी स्थानिक नागरिक एकमेकांच्या अंगावर वाइन ओतून हा दिवस साजरा करतात. या उत्सवाला `बॅटेला दी विनो` असंही म्हणतात. जगभरातले पर्यटक या उत्सवात सहभाग घेण्यासाठी स्पेनला येतात.
मद्याचा पहिला ग्लास चिअर्स करताना एकमेकांच्या डोळ्यांमध्ये पाहण्याची प्रथा फ्रान्स आणि जर्मनीतल्या नागरिकांमध्ये आहे. अचानक डोळ्यांचा संपर्क तुटला, तर लैंगिक जीवनाचा वाईट टप्पा सुरू होतो आणि हा कालावधी सात वर्षं टिकतो. तिथले नागरिक याला `सेव्हन इयर्स ऑफ बॅड सेक्स` असंही म्हणतात. पाण्याने भरलेला ग्लास मद्याच्या ग्लासवर आदळला तर शाप लागतो, असं स्पेनमध्ये मानलं जातं.
जर्मनीत विवाह सोहळ्यात एक प्रथा पाळली जाते. या प्रथेनुसार वराचे मित्र वधूचं खोटं अपहरण करून तिला बारमध्ये नेतात आणि तिथे तिला वराची प्रतीक्षा करायला लावतात. जेव्हा वर त्या बारमध्ये पोहोचतो आणि सर्वांना मद्य खरेदी करून पिण्यास देतो तेव्हा त्याच्या भावी पत्नीला सोडून दिलं जातं.
याशिवाय मद्याशी संबंधित आणखी एक प्रथा अशी आहे, की ज्यामुळे भारतीयांची स्थिती खरोखरच बिघडू शकते. रशिया आणि पोलंडचे नागरिक काहीही न मिसळता व्होडका पिणं योग्य मानतात. याचाच अर्थ या देशांमध्ये व्होडकात कोणत्याही प्रकारचं ज्यूस किंवा अन्य पेय मिसळणं वाईट मानलं जातं.
नेदरलॅंडमध्ये मद्यपानाशी संबंधित एक विचित्र प्रथा आहे. या प्रथेला कोप-स्टो-चे असं म्हटलं जातं. या प्रथेनुसार, बारटेंडर एका ट्युलिप शेप्ट शॉट ग्लासमध्ये जिनेवर (डच जिनचा एक प्रकार), तर त्याच्या शेजारच्या दुसऱ्या ग्लासमध्ये बीअर देतो. हे मद्य पिणाऱ्या व्यक्ती आपले हात मागे नेतात आणि जिनेवर थेट ओठांनी पिण्याचा प्रयत्न करतात. त्यानंतर ते बीअरचा एक घोट घेतात.
युक्रेनमध्ये विवाह सोहळ्यात वधूचे शूज चोरण्याची प्रथा आहे. भारतात वराचे बूट चोरले जातात आणि ते परत देण्यासाठी त्याच्याकडून मोठी रक्कम वसूल केली जाते. युक्रेनमध्ये वधूचे शूज चोरणारी व्यक्ती विवाह सोहळ्याला आलेल्या पाहुण्यांना त्या शूजमध्ये मद्य पिण्यास सांगू शकते. ऑस्ट्रेलियातही समारंभावेळी शूजमधून मद्य प्यायलं जातं. या प्रथेला तिथं Do a Shoey असं म्हणतात. या प्रथेनुसार शूजमध्ये मद्य ओतून ते प्यायलं जातं आणि नंतर शूज पायात घातला जातो.
कोरियामध्ये मद्यपानाशी संबंधित काही नियम आहेत. तिथं आपलं स्वतःचं पेय आपल्या ग्लासमध्ये ओतणं वाईट मानलं जातं. नेहमी दुसऱ्यांच्या रिकाम्या ग्लासात मद्य ओतायचं आणि दुसऱ्यांचा ग्लास रिकामा होईल तेव्हा तो तुम्ही पुन्हा भरायचा, अशी प्रथा कोरियात आहे. तुम्हाला एखादी व्यक्ती ड्रिंक देत असेल तर ते दोन्ही हातांनी स्वीकारणं अनिवार्य आहे. कोरियात सर्वसामान्यपणे कमी वयाचे नागरिक वयस्कर व्यक्तींना ड्रिंक सर्व्ह करतात. अशा वेळी कमी वयाची व्यक्ती कोणत्याही पदावरची असली तरी ती वयस्कर व्यक्तींना ड्रिंक सर्व्ह करते.
जगभरातले मद्यपी मद्यपानापूर्वी ग्लास एकमेकांवर हलक्याने आदळतात. परंतु, युरोपीय देश असलेल्या हंगेरीमध्ये असं करणं खूप वाईट मानलं जातं. 1849मध्ये हंगेरीतल्या काही क्रांतीकारकांची हत्या केल्यानंतर ऑस्ट्रियाच्या लष्करी अधिकाऱ्यांनी याच पद्धतीने ग्लास एकमेकांवर हलकेच आदळले होते. त्यानंतर हंगेरियन नागरिक या प्रथेपासून दूर गेले आणि असं करणं तिथं वाईट मानलं जाऊ लागलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Alcohol