औरंगाबाद, 07 डिसेंबर : कोरोनाबाधित (Corona) रुग्णांवर उपचार करण्यासाठी औरंगाबादमध्ये शासकीय रुग्णालय (aurangabad government hospital) 'घाटी'मध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. पण, मला घरी जाऊ द्या, या मागणीसाठी एका रुग्णाने राडा घालत तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे.
औरंगाबाद शहरामध्ये कोरोनाची परिस्थिती आता आटोक्यात आली असली तरी दररोज कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच आहे. कोरोनाबाधित रुग्णांना राज्य सरकारने ठरवून दिलेल्या नियमांनुसार, उपचार केले जात आहे. शहरातील शासकीय रुग्णालय घाटीमध्ये कोरोनाबाधित रुग्णांसाठी विशेष विभाग तयार करण्यात आला आहे.
परंतु, रविवारी रात्री एका रुग्णाने घरी जाण्यासाठी रुग्णालयामध्ये तुफान राडा घातला. या रुग्णाने दुपारपासून आपल्या घरी जावू द्यावे, यासाठी डॉक्टरांकडे मागणी केली होती. पण, उपचार पूर्ण झाल्याशिवाय डिस्चार्ज देण्यास डॉक्टरांनी नकार दिला होता. पण, तरीही या रुग्णाने घरी जाण्याचा तगादा लावून धरला होता. संध्याकाळी पुन्हा या रुग्णाने वैद्यकीय कर्मचाऱ्यांना घरी सोडण्याची विनंती केली असता त्यांनीही नकार दिला.
त्यामुळे संतापलेल्या या रुग्णाने रुग्णालयात तोडफोड करायला सुरुवात केली. कोरोना वार्डात त्याने जोरदार राडा घातला आणि घरी जाण्यासाठी पळू लागला. पण, डॉक्टर आणि सुरक्षारक्षकांनी कोरोना वार्डाचे दार बाहेरून बंद करून घेतले. पण, तरीही हा रुग्ण ऐकायला नाव घेत नव्हता. मुख्य दाराला लावलेल्या काचाही फोडून टाकल्या.
धक्कादायक, म्हणजे, कोरोनाबाधित असल्यामुळे या रुग्णाला पकडण्यासाठी कुणी पुढे येण्यास धजावत नव्हते.
अखेर सुरक्षारक्षक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन या कोरोनाबाधित रुग्णाला समज दिला. या घटनेमुळे काही काळ रुग्णालयात तणावाचे वातावरण पसरले होते.