बारामती, 28 डिसेंबर : माणसांचे वाढदिवस नित्याचेच. गाय-बैल, कुत्र्या-मांजराचाही वाढदिवस क्वचित कानावर येतो. मात्र, बारामतीमध्ये (Baramati) चक्क लाडाच्या बोकड्याचा जोरदार वाढदिवस साजरा करण्यात आला आहे.
बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे खुर्द येथे खोमण्यांच्या गोठ्यावर चक्क 'टायसन' नावाच्या बोकडाचा प्रथम वाढदिवस दणक्यात साजरा झाला. तुकाराम खोमणे व पंकूताई खोमणे या दाम्पत्याकडे अनेक बकऱ्या आणि गायी आहे. त्यात टायसन हा सर्वात वेगळा आणि भारदस्त असाच आहे. पांढऱ्या पाठीचा बोकड असल्यामुळे खोमणे यांनी त्याची खास काळजी घेतली. वर्षभरात नंतर टायसनची उंची आणि लांबी चांगलीच वाढली आहे.
शेळी पालन व्यवसायातील तज्ञ्जांनीही या टायसन बोकड्याचं कौतुक केलं आहे. त्यामुळे त्यांचा पहिला वाढदिवस हा दणक्यात साजरा करण्याचे खोमणे यांनी ठरवले होते. दोन दिवसांपूर्वी त्यांनी आपल्या लाडक्या टायसनच्या वाढदिवसाबद्दल सोशल मीडियावर पोस्ट सुद्धा टाकली होती. त्यामुळे गावात आता बोकड्याचाही वाढदिवस साजरा होणार, या चर्चेला ऊत आला होता.
अखेर ठरल्याप्रमाणे रविवारी 'टायसन'चा वाढदिवस साजरा करण्यात आला. तुकाराम खोमणे यांनी टायसनच्या नावाने केक कापून वाढदिवस साजरा केला. टायसनचं कौतुक करण्यासाठी विविध जिल्ह्यातून लोकं उपस्थित होती. तसंच शेळीपालन व्यवसायातील तज्ञ्जांनीही हजेरी लावली होती हे विशेष. गेले चार दिवस सोशल मीडियात 'टायसन'ची हवा चालली आहे. गावातील गावकऱ्यांनीही टायसनच्या वाढदिवसाला हजेरी लावली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.