सितापूर, 23 डिसेंबर: सरकारी कार्यालयामध्ये रजिस्ट्री करण्यासाठी आलेल्या एका ज्येष्ठ नागरिकांची पैशांनी भरलेली बॅग माकडानं (Monkey) पळवली. माकड ती बॅग घेऊन झाडावर चढलं आणि त्यानं बॅगेतल्या नोटा खाली फेकण्यास सुरुवात केली. झाडावरुन 500 च्या नोटांचा अचानक पा्ऊस सुरु झाल्यानं कार्यालयाच्या परिसरात काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. अखेर मोठ्या प्रयत्नानंतर मुळ मालकाला ती बॅग परत मिळाली. या घटनेचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे.
काय घडला प्रकार?
उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) मधील सितापूर (Sitapur) जिल्ह्यातील सरकारी कार्यालयात हा सर्व प्रकार घडला. सितापूर जिल्ह्यातल्या कासिमपूरचे भगवान हे ज्येष्ठ नागरिक त्यांच्या जमिनीची विक्री करण्यासाठी कार्यालयात आले होते. त्यांच्या बॅगेत एकूण 4 लाख रुपये होते. सर्व व्यवहार पूर्ण झाल्यानंतर भगवान एका झाडाखाली बसले होते. त्याचवेळी माकडांची एक टोळी तिथं आली. भगवान यांना काही समजण्याच्या आतच त्या टोळीमधील एका माकडानं त्यांची पैशांची बॅग पळवली आणि ते झाडावर चढले.
(हे वाचा-गुन्हेगारांची हिंमत तर पाहा... जेलमधून सुटका होताच असं झालं जंगी स्वागत)
त्या माकडानं झाडावर नोटांनी भरलेली बॅग उघडली. त्यामधील एक-एक बंडल तो फाडून खाली फेकत होता. काही बंडल त्याने न फाडता देखील फेकली. त्यांनी आरडाओरडा करुन अनेकांना गोळा केले. झाडावरुन माकड एक-एक नोटांचं बंडल खाली फेकत होते. खाली गोळा झालेली लोकांची या नोटा गोळा करण्यासाठी झुंबड उडाली होती. त्यामुळे भगवान यांना माकडाप्रमाणेच लोकांकडेही पैसे परत देण्याची विनंती करावी लागत होती.
लोकांचा सतत आरडाओरडा सुरु असल्याने ते माकड झाडावर सतत जागा बदलत होता. या खटाटोपातच त्याच्या हातामधून ती बॅग खाली पडली आणि भगवान यांनी अखेर सुटकेचा निश्वास सोडला.भगवान यांचे या सर्व प्रकारात जवळपास 10 ते 12 हजार रुपयांचे नुकसान झाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.