गाझियाबाद, 16 सप्टेंबर : भररस्त्यात एका वृद्ध महिलेला बेशुद्ध होईपर्यंत अमानुषपणे मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रस्त्यात हा भयंकर प्रकार घडत असताना स्थानिकांनी मात्र बघ्याची भूमिका घेतली. महिलेची छेड काढणाऱ्या आरोपीला वृद्ध महिलेनं विरोध केल्याच्या रागातून आरोपीनं या महिलेला बेदम मारहाण केली. महिला बेशुद्ध होईपर्यंत हातात मिळेल त्या वस्तुनं या महिलेला आरोपी मारहाण करत होता.
ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आरोपीनं क्रौर्याची परिसीमा गाठल्याचं पाहायला मिळत आहे. हा धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशातील गाझियाबाद इथे घडला.
An elderly woman was brutally assaulted in Kavi Nagar area of #Ghaziabad after she raised her voice against the eve teasing of her daughter by the same man. pic.twitter.com/nOG7nxxhIY
पीडितेचा मुलगा सुशांत चौधरी यांनी सांगितले की त्याच्या कॉलनीत एक व्यक्ती राहातो. हा व्यक्ती सर्व वयोगटातील मुली-महिलांची छेड काढत असतो. त्याची या परिसरात दहशत आहे. शनिवारी संध्याकाळी वृद्ध महिला जात असताना आरोपीने दुसर्या महिलेची छेडछाड करण्याचा प्रयत्न केला, ज्याचा विरोध या वृद्ध महिलेनं केला.
महिलेनं विरोध केल्याच्या रागातून या आरोपीनं या महिलेला चौकात मारहाण केली. तिथल्या लोखंडी खुर्चीनेही या महिलेवर हल्ला केला आहे. या घटनेदरम्यान महिला गंभीर जखमी झाली असून सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी या प्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा तपास गाझियाबाद पोलिसांकडून सुरू आहे.