सुरेंद्रनगर, 5 डिसेंबर : अनेकदा लग्नाच्या आगळ्या वेगळ्या बातम्या समोर येतचं असतात. पण हे केवळ लग्न नाही तर लग्नाला प्रेमाच्या दोरीनं घट्ट बांधणारं जीवंत उदाहरण आहे. हा अनोखा लग्नसोहळा गुजरातमधील सुरेंद्रनगर येथे पार पडला आहे. ज्याची बरीच चर्चा होत आहे. या लग्नाची खास बाब म्हणजे, एका मुलीने आपला जीवनसाथी म्हणून केवळ अपंग व्यक्तीची निवड केली नाही.
तर तिने लग्नमंडपात फेऱ्या घेताना स्वत: नवऱ्याची व्हीलचेयरही चालवली. हा अनोखा लग्नसोहळा लोकं पहातच राहिले. सोशल मीडियावर हा लग्नसोहळा प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.
पहिल्यांदा व्हिडिओमध्ये पाहिलं होत दिग्विजयला
दिग्विजय हा सुरेंद्रनगर येथील रहिवासी आहे. काही दिवसांपूर्वी दिग्विजयने दिव्यांग आंतरराष्ट्रीय व्हीलचेयर क्रिकेट स्पर्धेत भाग घेतला होता. हाच व्हिडीओ पोरबंदर जिल्ह्यातील मोराणा गावात राहणारी हिनाबाने पाहिला होती. तेव्हाच तिने त्याच्याशी लग्न करण्याचा निश्चय केला आणि त्याला जीवनसाथी म्हणून निवडले. यानंतर हिनाबाने दिग्विजयकडे लग्नाचा प्रस्ताव मांडला आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
हिनाबाने जेव्हा कुटुंबीयांना याबद्दल सांगितले, तेव्हा कुटुंबीयांनीही मुलीच्या आनंदाला सहमती दर्शविली. अशा प्रकारे या दोघांनी लग्न केलं. हा लग्नसोहळा सुरेंद्रनगरमधील गायत्री मंदिरात पार पडला.