बकिंगहमशायर, 19 एप्रिल : माणसाच्या हातून चुका घडतच असतात, किंबहुना जो चुका करतो तोच माणूस असंही म्हटलं जातं. काही जण चुकांना सुधारणं हीच संधी मानतात आणि सुधारणा करतात. काही चुका मात्र जीवघेण्या ठरतात, तर काही चुका प्रचंड लाजिरवाणी स्थिती निर्माण करतात. अशीच एक लाजिरवाणी स्थिती निर्माण करणारी चूक ब्रिटनमधल्या बकिंगमशायरमधल्या (Buckinghamshire)एका महिलेकडून घडली.
रोसिएन डॉज (Roseanne Dodge) या महिलेच्या घरातल्या किचनच्या भिंतीचा काही भाग पडला होता, त्यामुळे भिंत नव्याने बांधण्यासाठी ती प्लास्टर करणाऱ्या कारागिरांचे फोन नंबर्स फेसबुकवर शोधत होती. त्यातून तिला तिघांचे नंबर मिळाले. त्या नंबर्सवर तिने आधी भिंतीचे फोटो पाठवायचं ठरवलं, जेणेकरून परिस्थिती पाहून ते कारागीर खर्चाचा अंदाज देऊ शकतील.
तिने फोटो पाठवलेही; पण त्या फोटोंमध्ये तिचा स्वतःचाच नग्नावस्थेतला फोटोही टिपला गेला होता. कारण भिंतीचे फोटो काढताना तिच्या घरात कोणीही नव्हतं आणि ती नग्नावस्थेत होती. त्याच स्थितीत असताना तिने भिंतीचे फोटो काढले; मात्र भिंतीवर समोरच्या बाजूला एक आरसा (Mirror)होता आणि त्यात आपलं नग्न प्रतिबिंबही दिसतंय, हे तिच्या लक्षातच आलं नाही. भिंतीच्या फोटोत तेही टिपलं गेलं आणि तिने तो फोटो लगेच त्या कारागिरांना पाठवलाही.
कारागिरांनी तो फोटो पाहिला आणि तिच्याकडे काम करण्यास नकार दिला. तिने त्याचं कारण विचारलं, तेव्हा त्यांनी तिच्या ही बाब लक्षात आणून दिली. त्यापुढची गोष्ट म्हणजे तिने आपल्या एका मैत्रिणीला या चॅटचे स्क्रीनशॉट्स शेअर केले. तिथून ते व्हायरल झाले.
या महिलेच्या चुकीतून तिला स्वतःला तर धडा मिळालाच आहे;पण तिची गेलेली अब्रू परत मिळण्याची शक्यता नाही. तिच्याकडून आयुष्यात पुन्हा अशी चूक होण्याची अजिबात शक्यता नाही; पण स्मार्टफोनच्या युगात वावरणाऱ्या सर्वांनीच या घटनेवरून धडा घेतला पाहिजे. आपण कसले फोटो काढतोय, त्या फोटोत काय दिसतंय, सोशल मीडियावरून कोणाला तरी पर्सनल किंवा पब्लिकली फोटो पाठवताना, आपण काही वावगं तर पाठवत नाही आहोत ना, याची खात्री बाळगणं अत्यावश्यक आहे. कारण सोशल मीडियात गेलेली गोष्ट म्हणजे धनुष्यातून सुटलेला बाणच जणू. तो थांबवता येणार नाही आणि परतही येणार नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.