मुंबई, 6 जानेवारी- दिवसेंदिवस फसवणुकीच्या आणि चोरीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अनेक ठिकाणी तर दिवसाढवळ्यादेखील चोरी करण्याचं धाडस चोर करतात. कमीत कमी वेळात चोरी करून पळून जाण्यावर चोरट्यांचा भर असतो. कारण, घटनास्थळी जास्त वेळ थांबल्यास पकडलं जाण्याची शक्यता असते; मात्र मध्य प्रदेशमधल्या एका चोराला पकडलं जाण्याची अजिबात भीती नसल्याचं दिसत आहे. शिवपुरी जिल्ह्यातल्या खनियाधना शहरातल्या एका चोराने दुकानात प्रवेश केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये चोर चोरी करण्यापूर्वी बेधडकपणे मद्यधुंद अवस्थेत नाचताना दिसत आहे. नाचगाणं झाल्यानंतर चोरट्यानं दुकानातून काही रोख रक्कम आणि लॅपटॉपसह हिशेबाची वही चोरून नेली. चोरीची ही घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली आहे. खानियाधना पोलिसांनी गुन्हा दाखल करून डान्सर चोराचा शोध सुरू केला आहे. 'टीव्ही 9 हिंदी'ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे
मिळालेल्या माहितीनुसार, खनियाधना शहरातल्या सुनील कुमार जैन यांचा मुलगा सोमी जैन (वय 32 वर्षं) टाइल्सचा व्यवसाय करतो. सोमी जैन यांनी 3 जानेवारी रोजी खनियाधना पोलीस स्टेशनमध्ये चोरीचा गुन्हा दाखल केला. चोरानं दुकानातून लॅपटॉपसह काही रोख रक्कम चोरून नेल्याचं या तक्रारीत म्हटलं आहे. दुकान मालक सोमी जैन यांनी सांगितलं होतं, की त्यांच्या दुकानात लावलेला कॅमेरा आणि डीव्हीआर चोरट्यानं फोडला होता. डीव्हीआर दुरुस्त केल्यानंतर चोराचा व्हिडिओ समोर आला आहे.
(हे वाचा:नवरा-बायकोचा हा डान्स पाहताना नजर हटणार नाही, VIDEO चा इंटरनेटवर धुमाकूळ )
दुकानाच्या दरवाजाचं कुलूप तोडून चोरट्याने दुकानात प्रवेश केला होता. विशेष म्हणजे हा चोर साडेतीन तास दुकानात थांबला होता. चोरानं आधी खिशात ठेवलेला गुटखा काढून खाल्ला आणि नंतर नाचायला सुरुवात केली. काही वेळानं त्याची नजर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर पडली. त्यानंतर त्यानं नाचणं बंद केलं आणि एक-एक करून दुकानातले सर्व सीसीटीव्ही कॅमेरे फोडले. याशिवाय दुकानाबाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यासह डीव्हीआरही फोडला होता.
या व्हिडिओच्या पडताळणीवरून या चोराचं नाव गोलू यादव असल्याचं पोलिसांना समजलं आहे. खनियाधना पोलीस स्टेशनचे प्रभारी तिमेश छारी यांनी सांगितलं, की आरोपी चोराची ओळख पटली आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. त्यामुळे तो लवकरच पोलिसांच्या हाती लागेल. परिसरातल्या नागरिकांना सीसीटीव्ही फुटेज दाखवून आरोपीची ओळख पटवली गेली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Lokmat news 18, Video viral, Viral news