बॉर्नियो, 26 नोव्हेंबर : जग बदलतंय असं म्हटलं जातं. निसर्गही बदलतोय आणि त्यामुळे त्याचा परिणाम निसर्गातल्या घटकांवर होणं अपरिहार्य आहे. अन्नासाठी निसर्ग, जंगलावर अवलंबून असलेल्या प्राण्यांच्या खाण्याच्या काही ठराविक सवयी असतात. सहसा ते त्याच्यापलीकडे जात नाहीत. आता मात्र या सवयी बदलत चालल्या आहेत का असा प्रश्न निर्माण होतो. याचं कारण म्हणजे बॉर्नियोच्या (Borneo) एका जंगलात शाकाहारी ओरांगउटाननं (Orangutan) मांस खाल्ल्याचं समोर आलं आहे. याबद्दलचं वृत्त ‘आज तक’नं दिलं आहे.
सहसा ओरांगउटान मांस खात नाहीत. त्यामुळे या घटनेमुळे जीवशास्त्रज्ञही विचारात पडले आहेत. बॉर्नियोतल्या सेंट्रल कालिमंटनमधल्या कापूस परिसरात एका बोर्नियन ओरांगउटाननं (Bornean Orangutan) स्लो लॉरिस (Slow Loris) नावाच्या एका प्रायमेटला मारलं आणि नंतर त्याला खाल्लं. स्लो लॉरिस हा माकडांच्या प्रजातीमधलाच एक छोटा प्राणी आहे.
2003 ते 2017 सालापर्यंत बॉर्नियन ओरांगउटानच्या खाण्यापिण्याच्या आणि अन्य सवयींचा वन्यजीव अभ्यासक सातत्यानं अभ्यास करत होते. ओरांगउटान्सना सगळ्यांत जास्त फळं आवडतात असं या अभ्यासातून समोर आलं होतं. ओरांगउटान 61 टक्के फळं, नवीन पानांना 14 टक्के, फुलांना 8 टक्के आणि किड्यांना 5 टक्के अशी पसंती देत आहेत, असा दावा या अभ्यासातून करण्यात आला आहे; मात्र 2017 मध्ये पहिल्यांदाच ओरांगउटान मांसाहार करताना दिसला. त्यामुळे जीवशास्त्रज्ञांनी या पूर्ण घटनेचा व्हीडिओ तयार केला आहे, फोटोही घेतले आहेत. ही घटना जरी 2017 मधली असली तरी आता हा अभ्यास प्रायमेट मानाच्या जर्नलमधून पुढे आला आहे.
बॉर्नियन ओरांगउटानच्या (Bornean Orangutan) या वर्तनामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यानं केलेला हल्ला आणि खाण्यापिण्याच्या या नव्या पद्धतीमुळे हे प्रश्न निर्माण झाले आहेत. अशा प्रकारची ही पहिलीच घटना आहे. त्यामुळे त्याचा नेमका अर्थ काढणं अवघड आहे असं अभ्यासकांचं म्हणणं आहे.
हे ही वाचा-VIDEO:अजगराच्या अंड्यांना हात लावण्याचा करत होता प्रयत्न, सापानं असं केलं की...
या ओरांगउटानचं नाव मोलोंग (Molong) असं आहे. तो त्याची मादी आणि तीन वर्षांचं पिलू केटांबेबरोबर एका झाडाच्या फांदीवर बसला होता आणि झाडाची पानं खात होता. ओरांगउटानचं सर्वसामान्य आयुष्य हे असंच असतं; पण अचानक मोलोंग दुसऱ्या एका झाडाच्या दिशेनं धावला. त्या झाडावर त्याला स्लो लॉरिस प्रायमेट दिसला होता. स्लो लॉरिस सहसा जमिनीवर उतरत नाहीत. त्यांना जमिनीवरून परत झाडावर चढणं कठीण जातं त्यामुळे ते सहसा झाडावरच असतात. मोलोंगनं त्याला झाडाच्या फांदीवरून खाली पाडलं. त्यानंतर मोलोंगनं स्लो लॉरिसला पकडलं आणि तो परत त्याच्या फांदीवर येऊन बसला. हे सगळं त्याची मादी केरी आणि त्याचं पिलू केटांबे पाहत होते. मोलोंग त्याच्या कुटुंबाजवळ येऊन त्या स्लो लॉरिसला मारून खाऊ लागला. त्यातला हिस्सा त्याच्या मादीनं मागितला; पण त्यानं दिला नाही. सहसा ओरांगउटान प्रत्येक गोष्ट आपल्या परिवाराबरोबर खातो. या सगळ्या बदलांमुळे संशोधकांची काळजी वाढली आहे.
स्लो लॉरिसच्या शरीरात एक भयंकर विष असतं. एका ग्रंथींमधून हे विष स्रवत असतं. आपल्या सावजाला मारण्याआधी ते हे विष आपल्या दातांवर चोळतात आणि मग शिकारीवर हल्ला करतात. या विषाच्या दातांनी स्लो लॉरिसनं माणसावर हल्ला केला तर माणूस काही काळ निदान बेशुद्ध तरी होतोच; पण मोलोंगवर मात्र काहीही परिणाम झाला नाही. मोलोंगनं केलेल्या या शिकारीमुळे आणि त्याच्या वागण्यामुळे वन्यजीव अभ्यासकांना अभ्यासाचा नवा विषय मिळाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Wild animal