कुंदन जाधव, प्रतिनिधी
अकोला, 21 सप्टेंबर : 'देव तारी त्याला कोण मारी' या म्हणीची प्रत्यय अकोल्यातील पिंजर गावात आला. नदीपात्रात पाहत असताना अचानक बाप आणि मुलाचा तोल गेला अन् दोघेही नदीत कोसळले. पाण्याच्या प्रवाहात वाहत जात असताना कुठे तरी आसरा मिळाला आणि दोघांचेही प्राण वाचले.
अकोल्यातील पिंजर ते बार्शीटाकळी रोडवरील दोनद येथील काटेपूर्णा नदीच्या पुलाजवळ ही घटना घडली. कारंजा येथून पती, पत्नी आपल्या 3 वर्षांच्या मुलासह दुचाकीने अकोला येथे जात होते. दोनद जवळील पुलावर काटेपुर्णा धरणाचे पाणी सोडल्याने नदी दुथडीभरुन वाहत आहे. हे पाणी पाहण्यासाठी हे कुटुंब थांबले होते. यावेळी मुलाला आपल्या पोटाशी दुप्पट्याने बांधून असलेल्या परीस्थिती पाणी पाहत असताना अचानक बापाचा नदीत तोल गेला आणि दोघेही बापलेक नदीत पडले.
नदीला पूर आल्यामुळे पाण्याच्या प्रवाहात दोघेही वाहत जाऊ लागले होते. एवढ्यातच पुलापासून 500 मीटर अंतरावर वाहत गेल्यावर एका झाडाची काठी हातात लागली. झाडाला पकडत पकडत एका ठिकाणी मुलाला घेऊन थांबले. आणि लगेच दोनद येथील भारत ढिसाळे, शिवम अनारसे, युवराज सुर्वे, गणेश नारायण नागे, वैभव मनोहर प्रधान, भिकाजी उजवणे, संतोष कदम या नागरिकांनी नदीत उड्या मारून त्या दोघांही बापलेकांना सुखरुप बाहेर काढले.
दोघांवर पिंजर येथे शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी दोघेही सुखरूप असल्याचे सांगितले. लगेच नातेवाईक आईसह दोघा बापलेकांना कारंजा येथे घेऊन गेले. यावेळी 'देव तारी त्याला कोण मारी' याचा प्रत्यय आला.