नवी दिल्ली, 7 एप्रिल : जुगाड या शब्दाला विविध छटा आहेत. एखादी गोष्ट सरळ, ठरलेल्या, आखून दिलेल्या मार्गानी होत नसेल तर कुठल्याही पद्धतीनी ती साध्य करू शकलात तर त्या नव्या मार्गाला जुगाड म्हणतात. आता हा जुगाड कशातही होऊ शकतो. असाच एक जुगाड एका काकांनी केला आहे. पुरूष दाढी करण्यासाठी वस्तारा किंवा रेझरचा वापर करतात. दोन प्रकारी रेझर वापरली जातात एकात ब्लेड बसवलेली असतात आणि दुसऱ्या प्रकारात ब्लेड ठेवून दाढी झाल्यावर ते काढून घेता येतं. दाढी करणाऱ्यांना अनेकदा कापतं आणि रक्तही येतं. या अडचणीतून वाट काढण्यासाठी या काकांनी केलेला जुगाड खरोखरच कौतुकास्पद आहे. हा जुगाड इंटरनेटवर व्हायरल झाला असून तो प्रचंड लोकप्रियही होत आहे.
झी न्यूजने हा जुगाडचा व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. या व्हिडीओमध्ये एक काका दाढी करताना दिसतायेत. त्यांनी काड्या आणि दोरा यांचा वापर करून दाढी करण्याचं उपकरण तयार केलं आहे. इंग्रजी V आकारात त्यांनी दोन काड्या एकमेकांना जोडल्या आहेत जेणेकरून दाढी करणं सुकर व्हावं. रेझरमधल्या ब्लेडच्या जागी या काकांनी दोऱ्याचे अनेक धागे जोडले आहेत. या दोऱ्यांमुळेच त्यांच्या गालावरील दाढीचे केस कापले जात आहेत.
लक्षपूर्वक बघितलं तर रेझरनी किंवा वस्ताऱ्यानी जशी दाढी होते तशीच तुळतुळीत दाढी होताना दिसते आहे. दोरा वापरून दाढी करण्याचं हे अजब तंत्र वापरणाऱ्या या व्यक्तीचं नाव अजून कुणाला माहीत नाही. तसंच ही व्यक्ती कुठं राहते आणि हा व्हिडीओ कुठे शूट झाला आहे याबद्दलही काहीच माहिती मिळालेली नाही. हे तंत्र अगदी नवं असलं तरीही भारतीयांसाठी अशी तंत्र शोधून काढणं हे काही नवं नाही. अशी शक्कल लढवणं किंवा जुगाड करणं किंवा DIY (Do It Yourself) टेक्निक शोधण्याची भारतीयांना सवयच आहे. खेड्यात अनेक गोष्टींची सुविधा नसते अशा ठिकाणी स्थानिक लोक अनेक गोष्टी शोधून काढतात आणि परिस्थिती सोयीची करून घेतात. त्यांनी लढवलेल्या शक्कलेची चर्चा होत नाही किंवा बातमी छापून येत नाही इतकंच.
या आधी एका काकांनी घरच्या घरी कंगवा, ब्लेड आणि कागदांना लावायची क्लिप वापरून केस कसे कापता येऊ शकतात याचा व्हिडीओ शेअर केला होता. तोही प्रचंड गाजला होता. विशेष म्हणजे त्यांनी ट्रिमर किंवा कात्री अजिबात वापरली नव्हती. या व्हिडीओत असं दिसतंय की ते काका एका मोठ्या आकाशी रंगाच्या कंगव्यावर त्याच्या दातांजवळ ब्लेडचं पातं ठेवतात आणि त्या ब्लेडला क्लिप लावतात. त्यामुळे त्यांचा कंगवा ट्रिमरसारखा वापरता येतो. ते काका सहजपणे केसांतून कंगवा फिरवावा तसात हा त्यांचा देशी ट्रिमर फिरवतात आणि त्यांचे केस व्यवस्थित कापले जातात. हा प्रयोग करताना कानांना ब्लेड लागणार नाही याची काळजी घ्या असंही ते काका सुचवतात.
This is some next level jugaad 💇🏽♂️ pic.twitter.com/koNq5DildI
— Anup Kaphle (@AnupKaphle) May 17, 2020
जेव्हा कोविडमुळे देशव्यापी लॉकडाउन जाहीर झाला होता त्या वेळी हा व्हिडीओ शेअर केला गेला होता. त्या काळात सलून वगैरे बंद होती. लोकांनी केस आणि दाढी वाढवली होती. काही जण एकमेकांचे केस कापतानाचे व्हिडीओ अपलोड करत होते तर काही जण अशा युक्त्या शेअर करत होते. असे जुगाड अनेकदा जगणं सोपं करतात पण दरवेळी तसं होईलचं असं नाही त्यामुळे सुरक्षिततेचा विचार करूनच असे जुगाड करण्याचा प्रयत्न करा.