पाटणा, 16 सप्टेंबर : महाराष्ट्रात मराठवाडा आणि विदर्भातील काही राज्यांमध्ये मुसळधार पावसानं दमदार बॅटिंग केल्यामुळे काही गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रासह उत्तर भारतातील अनेक परिसरांमध्ये तुफान पाऊस सुरू आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणीचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. तर कुठे भूस्खलन आणि इमारत कोसळण्याच्या घटना समोर आल्या आहेत.
नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये 6 वर्ग असलेली शाळा मुसळधार पावसात पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली आहे. दुथडी भरून वाहणाऱ्या नदीत या शाळेनं जलसमाधी घेतली आहे. अंगावर काटा आणणारा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
लॉकडाऊन आणि कोरोनामुळे सुदैवानं ही शाळा बंद होती आणि क्वारंटाइन सेंटरसाठी या शाळेचं नाव देखील नव्हतं. त्यामुळे ही शाळा बंद असल्यानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. हा धक्कादायक व्हिडीओ बिहारमधील पूर्णिया परिसरातील असल्याची माहिती मिळाली आहे. सरकारी योजनेतून ही शाळा विद्यार्थ्यांसाठी बांधण्यात आली होती.
गेल्या काही दिवसांपासून बिहारमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात जनजीवन विस्कळीत झालं आहे.