मराठी बातम्या /बातम्या /Viral /अमेरिकेतल्या पोलिसांच्या कुत्र्याने चोरून खाल्लं अधिकाऱ्याचं जेवण! पोलिसांची Post Viral

अमेरिकेतल्या पोलिसांच्या कुत्र्याने चोरून खाल्लं अधिकाऱ्याचं जेवण! पोलिसांची Post Viral

सोर्स : गुगल

सोर्स : गुगल

अमेरिकेतल्या एका पोलिसी कुत्र्याकडून घडलेल्या एका छोट्या चुकीची सध्या जगभर चर्चा सुरू आहे.

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Mumbai, India

  मुंबई 30 जानेवारी : पोलिसांचं श्वानपथक म्हटलं, की आपल्या डोळ्यांसमोर येतात ते निडर आणि भीतिदायक असे चपळ आणि शक्तिशाली कुत्रे. चोरांचा किंवा संशयास्पद गोष्टींचा माग काढण्यात पोलिसांना ते मदत करतात आणि पोलीस गुन्ह्याची उकल करू शकतात. हे पोलिसी कुत्रे किती शिस्तीचे आणि आज्ञाधारक असतात हेही आपल्याला त्यांच्या कवायतींतून किंवा सोशल मीडियावरच्या वेगवेगळ्या व्हिडीओमधून पाहायला मिळतं; पण शेवटी प्राणीच तो, कधी तरी त्याच्याकडूनही चूक घडायचीच!

  एवढ्या शिकल्या-सवरलेल्या माणसांच्या हातून किती मोठ्या चुका होतात, तिथे कुत्र्याचं काय! पण अमेरिकेतल्या एका पोलिसी कुत्र्याकडून घडलेल्या एका छोट्या चुकीची सध्या जगभर चर्चा सुरू आहे. त्याचं कारणही तसंच आहे. कारण पोलिसांनीच त्याबद्दल फेसबुकवर पोस्ट करून सोबत आरोपी कुत्र्याचा फोटोही पोस्ट केला आहे. तो फोटो खूप व्हायरल झाला आहे. तसंच, पोस्ट वाचून अनेक जण त्या कुत्र्याच्या बाजूने उभे राहिले आहेत.

  हे ही पाहा : Viral Video : पाण्यावर अचानक धावू लागला कुत्रा, पाहून नेटकऱ्यांना फुटला घाम

  मिशिगनमधल्या विअँडॉट पोलिस डिपार्टमेंटने (WPD) ऑफिसर आइस नावाच्या कुत्र्यावर आरोप ठेवला असून, त्याच्या फोटोसह फेसबुक पोस्ट शेअर केली आहे. त्याने 12 जानेवारी रोजी एका पोलिस अधिकाऱ्याचं जेवण चोरून खाल्ल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.

  पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, ऑफिसर बारविग नावाचे पोलीस अधिकारी ब्रेकरूममध्ये जेवत होते. त्या वेळी त्यांना WPD तुरुंगातून एका व्यक्तीला मदत करण्यासाठी तातडीने पाचारण करण्यात आलं. तेव्हा ते आपलं जेवण तसंच टेबलवर ठेवून लगेच उठले आणि सेवेत रुजू झाले. थोड्या वेळानंतर ऑफिसर बारविग जेव्हा अन्य एका अधिकाऱ्यासह परत आले, तेव्हा त्यांना दिसलं, की ऑफिसर आइस ब्रेकरूममधून जिभल्या चाटत बाहेर येत होता. टेबलवरचं त्यांचं सगळं जेवण गायब झालं होतं! साहजिकच ते ऑफिसर आइसच्या पोटात गेलं होतं.

  ऑफिसर आइस तपासात सहकार्य करत नसल्याचंही पोलिस खात्याने म्हटलं आहे. काही वेळा कचऱ्यात शोधाशोध करून त्यातले ट्रॅश कॅन्स इकडेतिकडे पसरवून ठेवणं, बाजूने जाणाऱ्यांच्या हातातले खाद्यपदार्थ पळवणं असे इतरही अनेक आरोप त्याच्यावर असल्याचं पोलिसांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.

  फेसबुकवर ही पोस्ट 14 हजार जणांनी शेअर केली असून, 25 हजारांहून अधिक जणांनी ती लाइक केली आहे. 'या निष्पाप अधिकाऱ्याला सोडून द्या. त्यासाठी पोलीस मुख्यालयाच्या बाहेर निदर्शनं करण्याची गरज आहे का,' अशी कमेंट एका व्यक्तीने केली आहे.

  'आइसला न्याय मिळू द्या. मी त्याला पाठिंबा देतो,' असं अन्य एकाने म्हटलं आहे.

  अखेर 18 जानेवारीला पोलीस खात्याने फेसबुकवर एक अपडेट पोस्ट केला आहे. 'आइसचा तपास केल्यास किंवा त्याच्यावर आरोप ठेवल्यास मोठी निदर्शनं करण्यात येतील,' असे इशारे/धमक्या पोलिसांना आले असल्याचं त्या अपडेटमध्ये म्हटलं आहे. 'तो दोषी आहे असं लोकांना वाटत नाही. लोकांनी त्यांची भावना व्यक्त केली आहे. त्याच्यावर कोणतेही अंतर्गत शिस्तीचे किंवा गुन्हेगारी स्वरूपाचे आरोप लावले जाणार नाहीत,' असं त्या पोस्टमध्ये पोलिसांनी म्हटलं आहे. #nochargesforIce असा हॅशटॅगही त्या पोस्टमध्ये वापरण्यात आला आहे.

  First published:

  Tags: Dog, Shocking, Social media, Top trending, Viral