मुंबई 06 डिसेंबर : भारतात हिंदू विवाह कायद्यानुसार एक पत्नी जिवंत असताना किंवा कायदेशीर घटस्फोट घेतल्याशिवाय दुसरं लग्न करता येत नाही. असं असूनही सोलापूर जिल्ह्यातील एका तरुणानं एकाच मांडवात दोन जुळ्या बहिणींशी लग्न केलं आहे. या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्या मुलींचं या तरुणाशी लग्न झालं आहे त्यांना याबाबत अजिबात आक्षेप नाही. त्यामुळे तरुणावर गुन्हा दाखल करण्यात अर्थ नाही, असं अनेकांचं मत आहे.
तरुणाला केंद्रस्थानी ठेवलं तर हा बहुपत्नीत्वाचा मुद्दा ठरतो. पण, जगभरातील काही समुदायांमध्ये याच्या उलट परिस्थिती आहे. या समुदायांमध्ये एकाच स्त्रीला अनेक पती असतात. तिथे बहुपतित्व वाईट मानलं जात नाही.
भारतामध्ये सध्या बहुपतित्वाची पद्धत अस्तित्वात नाही. पण, हिंदू पुराणांतील दाखल्यांचा विचार केला तर, द्वापारयुगामध्ये महाभारतामध्ये द्रौपदीला पाच पतींसोबत (पांडव) संसार करावा लागला होता. अलीकडच्या काळाबद्दल बोलायचं झाल्यास, सुमारे दोन वर्षांपूर्वी चीनमधील फुदान विद्यापीठातील अर्थशास्त्रज्ञ ये केंग एन्जी यांच्या एका विधानानं गदारोळ माजला होता. त्यांनी 'बहुपतीत्वा'चा पुरस्कार केला होता.
चीनमधील सर्व तरुणांना वैवाहिक दर्जा मिळवायचा असेल तर अनेक तरुणांना एकाच मुलीचा पत्नी म्हणून स्वीकार करावा लागेल. कारण, सत्तरच्या दशकात 'वन चाइल्ड पॉलिसी' लागू झाल्यापासून चीनमध्ये लैंगिक भेदभाव वाढला आहे. मुलाच्या हव्यासापोटी पालक मुलींना गर्भामध्येच मारत आहेत. परिणामी, देशात मुलींची संख्या कमी आहे.
आता 'वन चाइल्ड पॉलिसी' रद्द करण्यात आली आहे. तरीदेखील तरुणांना लग्नासाठी मुली मिळेनाशा झाल्या आहेत. या अडचणी लक्षात घेऊनच अर्थशास्त्रज्ञ ये केंग एन्जी यांनी बहुपतित्वाबद्दल मत मांडलं होतं. आपलं म्हणणं मांडताना त्यांनी तिबेटमधील एका प्रथेचा उल्लेख केला होता.
तिबेटमध्ये आहे बहुपतित्वाची प्रथा
तिबेटमध्ये एकाच महिलेला अनेक पती असल्याच्या प्रथेचा उल्लेख सापडला आहे. अनेक वर्षांपासून चीनच्या दहशतीखाली तग धरून जगणारा तिबेट हा एक छोटासा देश आहे. त्यांच्याकडे आयुष्य जगण्यासाठी फारशी साधनं उपलब्ध नाहीत. येथील बहुतांश नागरिक शेतकरी आहेत. जे आपल्या संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह छोट्याशा शेतजमिनीवर चालवतात.
या परिस्थितीत, जर अनेक भाऊ असलेल्या कुटुंबातील प्रत्येकाची लग्नं झाली आणि त्यांना मुलं झाली, तर जमिनीचा छोटा तुकडा अनेक भागांमध्ये विभागला जाईल. या समस्येवर उपाय म्हणून तिबेटी समाजानं बहुपतीत्वाची प्रथा सुरू केली, असं म्हणतात. एक पती पैसे कमवण्यासाठी बाहेर गेला तर दुसरा पती तितक्याच जबाबदारीनं घर सांभाळू शकतो, असाही त्यामागे तर्क होता.
नेब्रास्का विद्यापीठानं सत्तरच्या दशकापासून आतापर्यंत अनेक मानववंशशास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनाचा अभ्यास केला आहे. या अभ्यासात असं आढळलं की, चीनच्या हस्तक्षेपानंतर तिबेटमध्ये कौटुंबिक कायदा लागू होऊन बहुपतीत्व बेकायदेशीर ठरवण्यात आलं आहे. पण, तिबेटमधील खेड्यांमध्ये अजूनही ही प्रथा सुरू आहे. 1988 मध्ये, तिबेट विद्यापीठानं सुमारे एक हजार कुटुंबांचा अभ्यास केला असता असं आढळलं की शहरी भागातील 13 टक्के लोक ही प्रथा मानतात.
फक्त तिबेटच नाही तर जगातील अनेक देशांमध्ये कमी-अधिक प्रमाणात बहुपतीत्वाची प्रथा मानली जाते. काही वर्षांपूर्वी केनियामध्ये अशी अनेक प्रकरणं घडली होती ज्यामध्ये एका महिलेनं अनेक पुरुषांशी लग्न केलं होतं. मसाई समाजात ही प्रथा चुकीची मानली जात नाही. ते लोक कौटुंबिक एकतेशी या प्रथेचा संबंध जोडतात.
दक्षिण अमेरिकेतील तुपी-कावाहिब समुदायातही अशी प्रथा दिसते. इतर अनेक जमातीदेखील ही प्रथा अयोग्य मानत नाहीत. भारतातही हिमाचल आणि दक्षिण भारतातील अनेक जमातींमध्ये ही प्रथा सुरू होती. सध्या ती अस्तित्वात आहे की नाही, याबाबत उघडपणे बोललं जात नाही.
एका घरात अनेक पती असल्यामुळे भांडणं होत नाहीत का? पत्नी सर्वांसाठी कसा वेळ काढते? असे प्रश्न बहुपतीत्व प्रथेबाबत पडणं साहजिक आहे. याचं उत्तर अमेरिकन मानववंशशास्त्रज्ञ मेव्हलिन गोल्डस्टीन यांच्या 'Wayne Brothers Share a Wife' या लेखात सापडतात.
गोल्डस्टीन यांनी तिबेटमध्ये अनेक दशकं घालवली आणि तेथील समाज जीवनाचं अगदी जवळून निरीक्षण केलं. ते लिहितात की, तिबेटी समाजात सहसा घरातील वडिलधारी मंडळी विवाह निश्चित करतात. जमिनीवरून भावांमध्ये भांडणे होऊ नयेत, हा एकच उद्देश असतो. यावर उपाय म्हणून ते बहुपतीत्वाचा अवलंब करतात.
ही लग्नं फार मजेशीर पद्धतीनं होतात. मोठा भाऊ आणि वधू मध्यभागी बसतात. त्यांच्या शेजारी इतर लहान भाऊ बसतात. लग्नाचे सर्व विधी मोठ्या भावासोबतच केले जातात. बाकीचे भाऊ साक्षीदार असतात. पण, नववधू घरात गेल्यानंतर तिला सगळ्यांची बायको मानलं जातं. या प्रथेमुळं अनेक भावांपैकी एकाचा मृत्यू झाला तरी पत्नी एकटी राहत नाही.
या प्रथेमध्ये काही क्लिष्ट प्रश्नही उपस्थित होता. जसं की, स्त्रीला झालेलं मूल कोणत्या पतीचं आहे, हे कसं ठरवलं जातं? या संदर्भात, त्या समाजांमध्ये अनेक गोष्टींचा विचार करून निर्णय घेण्यात आला आहे. ज्यामध्ये टोपी महत्त्वाची भूमिका बजावते. जेव्हा एखादी स्त्री पुरुषासोबत असते तेव्हा ती आपल्या खोलीच्या बाहेर टोपी लावते. हा एक प्रकारचा सिग्नल असतो.
अनेक भावांपैकी एकजण खोलीमध्ये आहे, असा त्याचा अर्थ होतो. जोपर्यंत एक भाऊ आत आहे तोपर्यंत इतरांना खोलीत प्रवेश करता येत नाही. बहुपतीत्त्वाच्या प्रथेतील विवाहातून जन्माला आलेल्या मुलांना सर्व पती आपलंच मुलं मानतात. ते कोणताही भेदभाव करत नाहीत. जेनेटिकली मुलाचे वडील कोण आहेत? याबद्दल कोणीही विचारत नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Shocking news, Top trending, Viral, Viral news