मुंबई, 18 सप्टेंबर : कुत्रा किंवा मांजर बऱ्याचदा बाईकवर किंवा कारमधून फिरताना अनेक व्हिडीओ पाहिले आहेत. अहो इतकच काय अगदी कोंबडा आणि पोपटही दुचाकीवर बसून गावभर हिंडत असल्याचे व्हिडीओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पण याता तर हद्द झाली राव एका तरुणानं आपल्यासोबत डबलसीट चक्क बैलाला नेलं आहे.
विश्वास बसणार नाही पण सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की डबलसीट मागे बैल बसला आहे. दुचाकीवरून त्याचा तोल जाऊ नये किंवा तो हलू नये आणि त्यामुळे चालकाचा तोल जाऊ नये म्हणून दुचाकीस्वारानं छान त्या बैलाला बांधलं आहे. दोघंही दुचाकीवरून जात असताना रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाशांनी हा प्रकार कॅमेऱ्यात कैद केला आणि हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
हा व्हिडीओ नेमका कुठला आहे याची अद्याप माहिती मिळू शकली नाही मात्र या तरुणानं आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड तोडल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत. पोपट, कुत्रा, मांजर अगदी कोंबडाही हौशीनं घेऊन जाणाऱ्या अनेक तरुणांचे व्हिडीओ यापूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पण या तरुणानं तर सगळेच रेकॉर्ड मोडून थेट बैलाला दुचाकीवर बसवलं आहे.
या व्हिडीओला सोशल मीडियावर लोकांनी खूप पसंत केलं आहे. हा व्हिडीओ पाहायला थोडा वेगळा वाटत असला तरी खरंच असं घडलं आहे. बैल हलू नये किंवा पडू नये म्हणून दुचाकीस्वारानं त्याला घट्ट बेल्ट बांधून ठेवला आहे. बैलानं बाईकसवारी केल्याचा हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे.