मुंबई 18 ऑक्टोबर : आपल्याला तर माहित आहे की बऱ्याचदा मोकाट कुत्रे हे रस्त्यावर लोकांच्या मागे लागतात. तसेच बऱ्याचदा लोकांवर या कुत्र्यांनी अटॅक केल्याचं देखील समोर आलं आहे. एवढंच काय तर पाळीव कुत्रे देखील हल्ला करत असल्याच्या घटना मागील काही दिवसांपासून वाढत चालल्या आहेत. हल्लीच लिफ्टमध्ये एका कुत्र्याने लहान मुलावर हल्ला केल्याची बातमी समोर आली होती, ज्यामुळे लोकांकडून संताप व्यक्त केला जात होता.
पण आता नोएडामधून एक अशी बातमी समोर आली आहे. जे ऐकून तुमचं काळीज पिळवटून निघेल. नोएडामध्ये एका सोसायटीतील दीड वर्षाच्या बाळावर तीन कुत्र्यांनी हल्ला केला, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे. या संदर्भात एक फोटो देखील व्हायरल होत आहे.
हे प्रकरण नोएडाच्या सेक्टर 100 मधील लोटस बुलेवर्ड सोसायटीचे आहे, जिथे भटक्या कुत्र्यांनी दीड वर्षाच्या मुलाला चावा घेतला आणि ठार केले.
या लहान बाळाच्या मृत्यूमुळे नोएडामध्ये आता निदर्शने सुरू झाली आहेत. लोकांचा संताप वाढत आहे. यासाठी समाजातील लोकांनी देखभाल आणि श्वानप्रेमींना जबाबदार धरले आहे. समाजाच्या आजूबाजूला भटक्या कुत्र्यांची दहशत वाढत आहे, त्यामुळेच बाहेर पडणेही कठीण होत असल्याचे लोकांचे म्हणणे आहे.
हल्ल्यामुळे मुलाच्या पोटातील आतडे बाहेर आले
कुत्र्याच्या हल्ल्यानंतर मुलाच्या पोटातील जखम इतकी खोल होती की त्याची आतडेही बाहेर आले असल्याचे बोलले जात आहे. जखमी मुलाला रिअॅलिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, मात्र रात्री उशिरा बारा वाजण्याच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.
मुलाचे पालक नोएडाच्या सेक्टर 100 मध्ये असलेल्या लोटस बुलेवर्ड सोसायटीमध्ये मजूर म्हणून काम करत होते आणि त्यांचं बाळ शेजारीच बसून खेळत होता. त्याचवेळी अचानक तीन कुत्र्यांनी मुलांवर हल्ला करून त्याला गंभीर जखमी केलं. जखमी मुलाला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, डॉक्टरांच्या पथकाने तातडीने उपचार सुरू केले, मात्र रात्री 12 वाजण्याच्या सुमारास मुलाचा मृत्यू झाला.
अलीकडच्या काळात कुत्र्यांच्या हल्ल्याच्या अनेक घटना समोर
यापूर्वी 18 सप्टेंबर रोजी नोएडामध्येच एका वृद्ध व्यक्तीवर कुत्र्याने हल्ला केला होता. त्याचवेळी, 6 सप्टेंबर रोजी नोएडामध्येच लिफ्टमध्ये कुत्र्याने डिलिव्हरी बॉयवर हल्ला केला होता, तर 6 सप्टेंबर रोजी गाझियाबादमध्ये लिफ्टमध्ये कुत्र्याने मुलाला चावा घेतला होता. केरळमधील कोझिकोड, मुंबई आणि लखनऊमध्येही कुत्र्यांनी हल्ला केल्याची अशीच प्रकरणे समोर आली आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Dog, Shocking news, Top trending, Viral