मुंबई, 02 डिसेंबर : गेल्या काही वर्षांत गुन्हेगारीचं प्रमाण वाढताना दिसत आहे. गुन्हेगार गुन्हे करण्यासाठी निरनिराळ्या पद्धतींचा वापर करत आहेत. काही गुन्हेगार वेबसीरिज, चित्रपट आणि टीव्ही मालिकांमधल्या प्रसंगांवरून प्रेरणा घेऊन गंभीर गुन्हे करत असल्याचं दिसून आलं आहे. सध्या नोएडातलं असंच एक हत्याकांड जोरदार चर्चेत आहे. नोएडातल्या एका तरुणीने टीव्ही सीरियल पाहून स्वतःच्या हत्येचा बनाव रचला. यादरम्यान तिने एका मुलीची हत्या केली. मृत मुलीची ओळख पटू नये यासाठी तिचा चेहरा अॅसिडने जाळून टाकला. पोलीस सध्या या हत्या प्रकरणाची चौकशी करत असून, आरोपी तरुणी आणि तिच्या प्रियकराला या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. टीव्ही सीरियलमधून प्रेरणा घेऊन केलेलं हे दुष्कृत्य सध्या चर्चेत आहे. `आज तक`ने याविषयीचं वृत्त दिलं आहे.
नोएडातल्या बिसरख इथल्या एका तरुणीने 'कुबूल है' ही सीरियल पाहून प्रियकराच्या संगनमताने स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचला. ही घटना खरी वाटावी यासाठी तिनं तिच्यासारखी अंगकाठी असलेल्या एका मुलीला जाळ्यात अडकवून तिची हत्या केली. इतकंच नाही, तर हत्येनंतर तिची ओळख पटू नये, यासाठी तिचा चेहरा अॅसिडने जाळून टाकला. आरोपी तरुणीने तिच्या हत्येची पुष्टी करण्यासाठी एक सुसाइड नोटदेखील लिहिली. तरुणीच्या भावाने आपल्या बहिणीला मृत समजून तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले; पण हा मृतदेह दुसऱ्याच मुलीचा होता.
हेही वाचा - व्यक्तीने हातावरच केला बारकोड टॅटू; कारण वाचून व्हाल थक्क
या प्रकरणाची सुरुवात 12 नोव्हेंबरला झाली. एका मुलीने आत्महत्या केल्याची माहिती दादरी पोलिसांना 12 नोव्हेंबर रोजी मिळाली. या मुलीचं वय 21 वर्षं होतं. मुलीचा चेहरा पूर्णपणे जळालेला होता. मृतदेहाजवळ एक सुसाइड नोटही सापडली. 'माझा चेहरा जळाला आहे. आता मी अशा चेहऱ्यासह जगू शकत नाही,' असं त्यात लिहिलं होतं. मृत मुलीचं नाव पायल असं सांगितलं गेलं. तिला दोन भाऊ आहेत. काही वर्षांपूर्वी तिच्या आई-वडिलांचं निधन झालं आहे. या मुलीच्या भावाने बहिणीचा मृतदेह समजून अंत्यसंस्कार केले; मात्र या घटनेतून आश्चर्यकारक सत्य बाहेर आलं. हा मृतदेह पायलचा नसून हेमलताचा होता.
या हत्या प्रकरणामागे लग्नाचा अँगल असल्याचं समोर आलं आहे. पायल तिच्या प्रियकरासोबत विवाह करू इच्छित होती. त्यामुळे तिने अशा प्रकारे स्वतःच्या हत्येचा बनाव केला. पायलचे आजोबा ब्रह्म सिंह यांनी सांगितलं, `पायल भाटी हिच्या विवाहाची तयारी सुरू होती; मात्र तिला तिचा प्रियकर अजयशी लग्न करायचं होतं; मात्र कुटुंबीय हे लग्न होऊ देणार नाहीत, अशी तिला भीती होती. त्यामुळे घाबरून तिनं हा बनाव रचला. यामुळे तिचा मृत्यू झालाय असं लोक समजतील आणि ती आरामात अजयशी विवाह करू शकेल.`
जेव्हा हेमलताच्या भावाने बहीण बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली, तेव्हा या घटनेचा खुलासा झाला. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांनी हेमलताचा नंबर ट्रेस केला. त्यातून नंतर अजय नावाच्या एका व्यक्तीचा नंबर मिळाला. हा अजय पायलचा प्रियकर होता. तेव्हा पोलिसांनी अजयची चौकशी सुरू केली आणि त्याने सर्व प्रकरण पोलिसांना सांगितलें.
पोलीस चौकशीत पायलने सांगितले, `काही वर्षांपूर्वी माझ्या आई-वडिलांनी आत्महत्या केली. या घटनेला भावाच्या सासरकडची मंडळी कारणीभूत आहेत, असं मला वाटतं. त्यामुळे मला त्यांना मारायचं होतं. स्वतःचा मृत्यू झाल्याचं सिद्ध करून मला त्यांची हत्या करायची होती. यामुळे कोणालाही माझ्यावर संशय आला नसता. 'कुबूल है' या टीव्ही सीरियलमधून मी प्रेरणा घेतली. यासाठी मी माझ्यासारख्याच दिसणाऱ्या हेमलताला माझ्या बढपुरातल्या घरी बोलावलं. त्यानंतर अजयच्या मदतीने तिची हत्या केली. हेमलताच्या हत्येनंतर माझ्या भावाच्या सासरकडच्या मंडळींनाही मारण्याची योजना होती.`
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.